पान एक-कृषी अधिकाऱ्याला १५ लाखाचा गंडा

पान एक-कृषी अधिकाऱ्याला १५ लाखाचा गंडा

Published on

कृषी अधिकाऱ्याला १५ लाखांचा गंडा
ऑनलाईन फसवणूक; महिलेसह दोघांविरोधात कणकवलीत गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत कृषी अधिकाऱ्याला ऑनलाईन गुंतवणुकीमध्ये भरभक्‍कम परताव्याचे आमिष दाखवून १५ लाख ४० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी विरेंदर मनसुखानी आणि आदिती सेन या ऑनलाईन कंपन्या चालविणाऱ्या संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचा हा प्रकार एप्रिल ते जून २०२४ या दरम्यान घडला आहे. दरम्यान, सायबर क्राईमकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फसवणूक झालेली व्यक्ती जिल्‍हा कृषी अधीक्षक कार्यालयात तंत्र अधिकारी आहे. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीमध्ये म्‍हटले आहे की, ते १४ एप्रिलला सोशल मीडिया (फेसबुक) पाहत असताना, त्‍यांना एक ट्रेडिंगची जाहिरात दिसली. यात शेअर मार्केट व इतर कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून भरघोस नफा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यावर असलेल्‍या ‘मनीसुख’ या स्‍टॉक ट्रेडिंग कंपनीच्या लिंकवर त्‍यांनी क्‍लिक केले आणि काही वेळातच अनोळखी व्यक्‍तीने त्‍यांना एका व्हॉट्‌स अॅपच्या ग्रुपवर समाविष्ट केले. त्‍यानंतर विरेंदर मनसुखानी याने अधिकाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्‌स अॅपव्दारे संपर्क साधला. आपण मनीसुख कंपनीचे अधिकारी आहोत, असे सांगून चॅटिंग केले. त्या माध्यमातून मनसुखानीने त्या अधिकाऱ्याला शेअर मार्केट, स्टॉक, त्‍यामधील गुंतवणूक आणि परतावा याबाबत माहिती दिली. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी कंपनीच्या आदिती सेन हिचा मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधण्याबाबत सूचविले. त्या अधिकाऱ्याने २० एप्रिलला सेन हिच्याशी संपर्क साधला. यावेळी सेन हिने गुंतवणुकीबाबत माहिती दिली आणि प्रायमरी ट्रेड खाते उघडण्यासाठी फॉर्म पाठवला. कृषी अधिकाऱ्याने त्‍याच दिवशी आपल्‍या पत्‍नीच्या नावे ऑनलाईन माध्यमातून ट्रेड खाते उघडले, तर १० मे रोजी मनसुख कंपनीकडून या खात्‍यामध्ये गुंतवणुकीसाठी पैसे भरा, असे सांगण्यात आले. कृषी अधिकाऱ्याने या खात्‍यावर ५० हजार रुपये बँक खात्‍याच्या माध्यमातून वर्ग केले. त्‍यानंतर १६ मे रोजी कंपनीने सुरू केलेल्या अधिकाऱ्याच्या ट्रेड खात्‍यावर सात हजार ३०० रुपयांचा बोनस देण्यात आला. त्‍यामुळे कृषी अधिकाऱ्याचा विश्‍वास बसला.
दरम्‍यान, त्‍या कृषी अधिकाऱ्याने १० मे ते १७ जून २०२४ या कालावधीत विविध बँकांकडून कर्ज घेऊन ट्रेड खात्‍यावर १५ लाख ४० हजार रुपये वर्ग केले, तर २० जूनला त्‍यांनी आपल्या पत्‍नीच्या नावे असलेल्‍या ट्रेड खात्‍यावर पाहिले असता, दोन कोटी ३४ लाख ६७ हजार ८११ रुपये जमा असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यांनी २१ जूनला या ट्रेड खात्‍यावरून ५० लाख रुपये काढण्यासाठी विनंती पाठवली. त्‍यावेळी काढण्यात येणाऱ्या र‍कमेच्या २५ टक्‍के म्‍हणजेच १२ लाख ५० हजार रुपये भरा, असे मनीसुख कंपनीकडून सांगण्यात आले. त्‍यावेळी कृषी अधिकाऱ्याने एवढी रक्‍कम आपणाकडे नाही, असे त्‍या कंपनीला सांगितले. त्‍यावेळी किमान पाच लाख भरा, असे सांगण्यात आले. तेवढीही रक्‍कम नाही, असे सांगितल्‍यानंतर मनीसुख कंपनीकडून एक लाख रुपये भरा, असे सांगण्यात आले. त्‍यावेळी त्‍या कृषी अधिकाऱ्याला मनीसुख ट्रेड कंपनीच्या नावे आपली आर्थिक फसवणूक केली जात असल्‍याचे लक्षात आले. त्‍यामुळे त्याने याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात मनीसुख कंपनीचे विरेंदर मनसुखानी आणि आदिती सेनविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. कणकवली पोलिसांनी संबधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, ही तक्रार सायबर क्राईमकडे वर्ग करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.