चिपळूण ग्रॅव्हिटी पाणी योजनेला १६० कोटी

चिपळूण ग्रॅव्हिटी पाणी योजनेला १६० कोटी

Published on

चिपळूण सायफण पाणी योजनेला १६० कोटी

तांत्रिक मंजुरी ; शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होणार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शहराला कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६० कोटींच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळवण्यात यश मिळाले. ग्रॅव्हिटी योजनेस तांत्रिक मान्यता मिळाल्याने पाणी योजनेचा मार्ग सुकर झाला असून, भविष्यात शहरातील मचूळ पाण्याचा प्रश्न निकालात निघण्यास मदत होणार आहे.
चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी आमदार शेखर निकम, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे आदींनी सातत्याने पाठपुरावा केला. शहरातील ग्रॅव्हिटी पाणी योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मंगळवारी सायंकाळी शासनातर्फे १६० कोटी खर्चाच्या या योजनेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. सद्यःस्थितीत शहरास गोवळकोट व खेर्डी येथून वाशिष्ठी नदीतील पाणी उचलून ते शहराला पुरवले जाते; मात्र अनेकदा खाडीचे पाणी वाशिष्ठी नदीत मिसळत असल्याने गोवळकोट येथून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून मचूळ पाणीपुरवठा होते. त्यामुळे गांधारेश्वर येथे जॅकवेल उभारून तेथून पाणी उचलून ते शहराला पुरवण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी काही लाखांचा निधीही मजूर करण्यात आला होता. वीजबिलोपोटीदेखील दर महिना पालिकेला लाखो रुपये मोजावे लागतात. त्यासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी गेल्या १० ते १५ वर्षापासून प्रयत्न सुरू होते. ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोळकेवाडी धरणातून थेट चिपळूण शहरास पाणीपुरवठा केला जाणार असल्याने शुद्ध व मुबलक पाणी शहरवासियांना मिळण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.