पान एक-करूळ घाटात दरडींचा पाऊस

पान एक-करूळ घाटात दरडींचा पाऊस

95063
करूळ ः घाटरस्त्यांमध्ये जागोजागी दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.

करूळ घाटात दरडींचा पाऊस
रुंदीकरणानंतरची स्थिती; वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः करूळ घाट वाहतुकीस बंद असला तरी घाटात सध्या दरडींचा पाऊस पडत आहे. पावसाच्या हलक्या सरी आणि किरकोळ वाऱ्यानेही दरडी नव्याने बांधलेल्या घाटरस्त्यावर कोसळत आहेत. रस्ता रुंदीकरणावेळी दरडी तोडल्याचा परिणाम असून पावसाळ्यात घाटरस्ता सुरू करणे जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे या घाटामार्गे पावसाळ्यात वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूक असलेल्या करूळ घाटमार्गाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. गेल्या पाच - सहा महिन्यांपासून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासोबत संरक्षक भिंती, गटारे, मोऱ्या आदी कामे सुरू आहेत. पूर्वीचा करूळ घाटरस्ता १४ ते १५ फुटांचा होता. नव्याने होत असलेल्या रस्त्यांची रुंदी किमान २० ते २१ फूट असणे आवश्यक होते. दरीकडील बाजूला भराव करून रुंदी वाढविणे शक्य नसल्यामुळे दरडीकडील बाजू तोडण्यात आली. हीच कृती आता भविष्यात धोकादायक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. स्थिरस्थावर झालेल्या दरडी तोडल्यामुळे संपूर्ण घाटमार्गातील दरडी भाग अधांतरी बनला आहे. घाट परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. याशिवाय वाऱ्याचा वेग देखील अधिक असतो; परंतु यावर्षी त्या तुलनेत अजूनही पाऊस झालेला नाही. सध्या पडत असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानेही घाटरस्त्यात अक्षरक्षः दरडींचा पाऊस पडत आहे. सद्यस्थितीत घाटरस्त्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी दरडी कोसळल्याचे चित्र आहे. जागोजागी दरडींचा खच पडला आहे. हलक्या पावसाने दगड मातीचा भराव रस्त्यावर येऊन पडत आहे. दरडी हटविल्याचा हा परिणाम आहे. करूळ घाटरस्त्याचे काम जरी पूर्ण झाले तरी या मार्गावरून संपूर्ण पावसाळ्यात वाहतूक करणे अतिशय धोकादायक ठरणार आहे. टनापेक्षा अधिक वजनाचे दगड रस्त्यावर येत असल्यामुळे अशा स्थितीत वाहतूक सुरू करण्याचे धाडस महामार्ग प्रधिकरण किंवा प्रशासन करेल, याची शक्यता नाही. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत घाट वाहतुकीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चौकट
कोसळलेल्या भिंतीचे पुनर्बांधकाम सुरू
करूळ घाटात नव्याने बांधलेली संरक्षक भिंत अलीकडेच कोसळली. २० मीटर लांबीची ही भिंत कोसळल्याने घाटरस्त्यांच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली. अनेकांनी संपूर्ण रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. आता कोसळलेल्या भिंतीचे पुनर्बांधकाम सुरू करण्यात आले असून, तळाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.

चौकट
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, सावंतवाडी आणि दोडामार्गला मुसळधार पावसाने झोडपून काढले. किनारपट्टीचे तालुके वगळता अन्यत्र सर्व जोरदार सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. भातरोप पुनर्लागवडीच्या कामांना गती प्राप्त झाली आहे.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com