पान एक-स्टॉलधारक महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न

पान एक-स्टॉलधारक महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न

95073
वैभववाडी : येथे शुक्रवारी एका महिला स्टॉलधारकाने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

स्टॉलधारक महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न
वैभववाडीत प्रकार; स्टॉल हटाओविरोधात उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः स्टॉल हटविण्यासाठी गेलेल्या नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर महिला स्टॉलधारक अंजली एकनाथ शिवगण यांनी आज अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानतंर त्या फूटपाथवरच बेशुद्ध पडल्या. या प्रकारानंतर शहरात खळबळ माजली. याची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी आले. हा प्रकार सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला.
नगरपंचायतीने कार्यालयासमोरचा परिसर सुशोभित केला आहे. तत्पूर्वी या जागेवर असलेले अनेक स्टॉल हटवून फूटपाथ, आधारभिंत आणि सुशोभीकरण केले. या फूटपाथवर शिवणकाम करणाऱ्या अंजली शिवगण यांनी दोन दिवसांपूर्वी स्टॉल उभा केला. तो काढून घ्यावा, अशी नोटीस नगरपंचायतीने त्यांना दिली होती. त्यानंतर त्या नोटिशीला सौ. शिवगण यांनी लेखी उत्तर देत आपल्याला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, सायंकाळी साडेचारच्या सुमारास नगरपंचायतीचे पाच ते सहा अधिकारी आणि कर्मचारी सौ. शिवगण यांच्या स्टॉलवर कारवाई करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांची शिलाई मशीन उचलून नगरपंचायतीत नेली. त्यानंतर सौ. शिवगण या आक्रमक झाल्या. माझी शिलाई मशीन स्टॉलमध्ये आणून ठेवा, असा आग्रह त्यांनी धरला; परंतु, कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी स्टॉलमध्ये असलेली डिझेलची बाटली बाहेर काढली. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यासमोर त्यांनी डिझेल अंगावर ओतण्यास सुरूवात केली. त्यानंतर काडीपेटी घेऊन त्या स्वतःला पेटवून घेणार इतक्यातच काही ग्रामस्थ आणि नगरंपचायतीचे कर्मचारी यांनी काडीपेटी काढून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर त्यांनी नगरपंचायतविरोधात आक्रोश सुरू केला. त्यातच त्या बेशुद्ध पडल्या. काही वेळानंतर त्या पुन्हा शुद्धीवर आल्या. त्यांनी आपली शिलाई मशीन आणून द्या; अन्यथा आपण पेटवून घेणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शिलाई मशीन आणून दिली. त्यानंतर त्या रुग्णालयात दाखल झाल्या.
सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, कॉन्स्टेबल जितेंद्र कोलते, हवालदार प्रीती शिंगारे, पी. एस. शिंगाडे, पुजाली राणे घटनास्थळी होते. अवसरमोल यांनी सौ. शिवगण यांच्याशी चर्चा करत टोकाचे पाऊल उचलू नका, असे सांगितले. त्यानंतर बराच वेळ नगरपंचायतीचे अधिकारी आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू होती. याची माहिती मिळताच शहरातील अनेक स्टॉलधारकांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेवर कारवाईची शक्यता
त्या महिलेवर कारवाई होण्याची शक्यता असून नगरपंचायतीचे कर्मचारी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीचा एक कर्मचारी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यत बसून होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com