‘लाडकी बहीण’साठी ‘झिरो बॅलन्स’ खाते

‘लाडकी बहीण’साठी ‘झिरो बॅलन्स’ खाते

Published on

‘लाडकी बहीण’साठी ‘झिरो बॅलन्स’ खाते

मनीष दळवी ः जिल्हा बॅंकेतर्फे योजना प्रभावी राबविणार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून ‘झिरो बॅलन्स’ने बचत खाते उघडण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
या योजनेच्या नाव नोंदणीसाठी १ जुलैपासून सुरुवात झाली असून, ३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांचे अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना दर महिना १,५०० रुपये महाराष्ट्र शासन जुलैपासून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. या कामासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक तर नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व पोर्टलवर अपलोड करण्याचे काम दिले आहे.
केंद्र व राज्याच्या सर्व लोकाभिमुख योजना राबविण्यामध्ये सिंधुदर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजनाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या सर्व ९८ शाखांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि डीबीटी आधार लिंकींग असणे गरजेचे आहे. त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत, परंतु ज्यांनी अजून बचत खाते उघडलेले नाही, अशा महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून ‘झिरो बॅलन्स’ने बचत खाते उघडण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. सिंधुदुर्गातील जास्तीतजास्त महिलांनी जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये आपले बचतखाते सुरू करावे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत खाते असलेल्या महिलांनी शाखेला भेट देऊन आपले खाते आधार लिंक करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन दळवी यांनी केले आहे.
58922
---
डाक विभागही सरसावला
ओरोस ः महाराष्ट्र शासनाद्वारे घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खाते हे शून्य रुपयांमध्ये काढून देण्यात येत आहे. या खात्याला आधार क्रमांक संलग्न करून त्यामध्ये महिला या योजनेचे पैसे जमा करून घेऊ शकतात, अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक मयुरेश कोले यांनी दिली.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांचे आधार संलग्न खाते असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेअंतर्गत महिलांचे कोणतेही पैसे न भरता (शून्य रकमेने), आधार संलग्न सेव्हिंग खाते उघडता येणार आहे. यासाठी महिलांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये केवळ आपले आधार कार्ड व फोटो घेऊन जाणे आवश्यक आहे. महिला या योजनेच्या लाभासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे देखील ‘शून्य बॅलन्स’ खाते काढू शकतात. महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा आपल्या गावातील तथा शहरातील पोस्टमन किंवा शाखा डाकपाल यांच्याशी संपर्क साधून आपले खाते उघडता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचे पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते उघडण्यासाठी सेवा देण्यास सज्ज आहे. ज्या महिलांचे पोस्ट ऑफिसमध्ये आधीच खाते आहे, परंतु खात्यास आधार क्रमांक संलग्न केलेला नाही, त्यांनी या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी त्वरित नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपला आधार क्रमांक खात्यास संलग्न करून घ्यावा व तो खाते क्रमांक या योजनेसाठी अर्ज करताना देता येईल. ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' योजनेसाठी पात्र असण्याऱ्या सर्व महिलांनी त्वरित आपल्या जवळच्या पोस्टात आधार संलग्न सेव्हिंग खाते अथवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते काढून घ्यावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या डाकघराशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक कोले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.