रत्नागिरी-गोमांस तस्करीच्या मुळाशी जाण्याचे आदेश

रत्नागिरी-गोमांस तस्करीच्या मुळाशी जाण्याचे आदेश

गोमांस तस्करीच्या
मुळाशी जाण्याचे आदेश

उदय सामंत; पोलिसांचीही आयजींमार्फत चौकशी

रत्नागिरी, ता. ६ : गोमांस वाहतुकीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत; परंतु समाजामध्ये वाद लावण्याचा हा प्रयत्न नाही ना, याची शहानिशा केली जाईल. गोमांसाची तस्करी केली जात असेल, तर या प्रकरणाच्या मुळाशी पोहचण्याचे आणि पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्यादृष्टीने पोलिसांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पोलिस विभागाकडून ग्रामीण पोलिस ठाण्यात गोळा झालेल्या जमावाला घेरण्याचा प्रयत्न झाला असेल आणि खबरदारीचा अतिरेक झाला असेल, तर या प्रकाराचीही कोकण परिक्षेत्र पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, ‘जनावरांचे अवशेष पकडल्याप्रकरणी मी अतिशय गंभीर आहे. पालकमंत्री म्हणून मी तत्काळ याबाबत पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. अनेकांच्या यामुळे भावना दुखावल्या आहेत. अशा वृत्तींना ठेचून काढायलाच हवेच; परंतु समाज-समाजामध्ये वाद लावण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, याची खात्री पोलिसांनी आणि इतरांनी करण्याची गरज आहे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गोमांसाची तस्करी होत असेल, तर हा प्रकार थांबलाच पाहिजे. पुराव्यानिशी तो सिद्ध करण्यास पोलिसांना सांगितले आहे.
या घटनेनंतर हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गोळा झाला. गुन्हेगाराला पकडण्यासाठी हा जमाव आग्रही होता. त्यामुळे पोलिसांनी या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा आणला. पोलिसांनी अपेक्षित सहकार्य न करता खबरदारीचा अतिरेक केला, असा जमावाचा आरोप आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, ‘पोलिसांनी असे केले असेल तर आयजींमार्फत त्याची चौकशी केली जाईल; परंतु पोलिसांनाही तपासासाठी अवधी दिला पाहिजे.’
----------------
चौकट-
श्री रत्नागिरीचा राजा गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम
श्री रत्नागिरीचा राजा गणेश मंडळाने अनोखा उपक्रम राबवला आहे. ५ ते १२ वीच्या मुलींना एसटीमध्ये जो फॉर्म आणि आयकार्डसाठी पैसे भरावे लागतात. गणेश मंडळाने तालुक्यातील ७० हजार ८०० मुलींचे पैसे एसटी महामंडळाला भरले आहेत. तो भुर्दंड आता मुलींवर पडणार नाही. अशाप्रकारे सामाजिक कार्य करणारे श्री रत्नागिरीचा राजा गणेशमित्र मंडळ हे राज्यातील पहिले असेल, असे मत सामंत यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com