बांदा बाजारपेठ पाण्याखाली

बांदा बाजारपेठ पाण्याखाली

Published on

95471
95470
95468


बांदा बाजारपेठ पाण्याखाली

दुकानांत पाणी ः बहुतांश मार्गांवरील वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः शहर व परिसराला आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शहरातील आळवाडी बाजारपेठेत घुसले. शहरातील मच्छिमार्केट-शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेला. गटारांच्या साफसफाईच्या मर्यादा पहिल्याच पावसात उघड झाल्याने शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने प्रशासनाने शहरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे, मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाका येथे तर बांदा वाफोली रस्त्यावर निमजगा येथे गुडगाभर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
परिसरात काल (ता.६) रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बांद्यात येत तेरेखोल नदी व परिसराची पाहणी करत आढावा घेतला. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले. तलाठी फिरोज खान, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीला मोर्ये यांनी तात्काळ शहरातील पूर प्रवण भागात धाव घेत पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना स्थानिकांना दिल्या. शहरात पाणी शिरण्याचा वेग वाढल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रारंभ केला. दुपारी तेरेखोल नदीचे पाणी आळवाडी परिसरात भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी आपले सामान अन्यत्र हलविण्यास सुरुवात केली. पावसाचा जोर कायम असल्याने तसेच नदीला भरती असल्याने पाणी वेगाने शहरात शिरले. बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर गडगेवाडी व पानवळ येथे गुडगाभर पाणी तसेच चिखल रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. याठिकाणी स्थानिक वाहनचालक जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत होते. बांदा-वाफोली रस्त्यावर शहरातील निमजगा येथे रस्त्यावर ३ फूट पाणी आल्याने येथील वाहतूक बंद होती. याठिकाणी असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या वस्तीत पाणी शिरल्याने त्यांचे सामान वाहून गेले. या वस्तीत तब्बल ३ फुटहून अधिक पाणी साचले होते.
मुसळधार पावसाने शहरातील गटारांच्या मर्यादा साफ उघड झाल्यात. अनेक ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आले होते. शहरातील गांधीचौक, कट्टा कॉर्नर, खेमराज ते नाबर स्कुल रस्ता, ग्रामपंचायत रस्ता, बांदेश्वर पिंपळेश्वर रस्ता स्मशानभूमी येथे गटारे तुंबल्याने पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. त्यामुळे स्थानिक पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. मुख्य बाजारपेठेतील गांधीचौक, उभाबाजार येथे गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने सखल भागातील दुकानात पाणी शिरले. तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी हे सायंकाळी राकेश केसरकर यांच्या दुकानापर्यंत होते. याठिकाणी व्यापारी तसेच स्थानिकांची घरे असल्याने पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. याठिकाणी स्थानिकांना तसेच पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दोन होड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच पाण्यात जाऊन वाचवीणाऱ्यांसाठी लाईफ जॅकेट देखील पुरविण्यात आली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत आळवाडी भागात पुराचे पाणी असल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत.
------------
तेरेखोल नदीला पूर
तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बांदा शहरसह परिसरातील इन्सुली, शेर्ले व वाफोली गावांना देखील बसला. येथील नदी किनाऱ्यालगत असलेल्या बहुतांश घरात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेर्ले येथे पुराच्या पाण्यातून वस्तीत वाहून आलेले मगरीचे पिल्लू स्थानिकांनी पकडून सुरक्षितस्थळी सोडले. अचानक पाणी भरल्याने सामान सुरक्षितस्थळी हलवीतना अनेकांची तारांबळ उडाली.
------------
चौकट
मुंबई-गोवा महामार्गावर पाणी
मुंबई गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाक्याजवळ महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग दोन तास वाहतुकीसाठी बंद होता. याठिकाणी पाणी ओसरल्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरु करण्यात आली. बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली फॅक्टरीनजिक रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. बांदा दाणोली रस्त्यावर विलवडे शाळेनजीक पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती.
-----------
चौकट
पुराच्या पाण्यात मोटार अडकली
आळवाडी येथे अचानक पाणी भरल्याने शैलेश लाड यांची मोटार पुराच्या पाण्यात अडकली. त्यांनी प्रसंगवधान दाखवत तात्काळ गाडीतून उतरत सुरक्षित ठिकाण गाठले. त्यानंतर स्थानिकांनी मोटार पाण्याबाहेर काढली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.