पान एक मेन-सिंधुदुर्गात पूरस्थिती गंभीर

पान एक मेन-सिंधुदुर्गात पूरस्थिती गंभीर

95450
कुडाळ ः मुसळधार पावसामुळे रविवारी शहरातील काळपनाका येथील दुकानात पाणी घुसले होते.

95506
दोडामार्ग ः तिलारी राज्य मार्गावर आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
95511
खारेपाटण ः शहरातील मच्छीमार्केट परिसर आणि तेथील दुकानांना पाण्याचा वेढा आहे. (छायाचित्र ः रमेश जामसंडेकर)


सिंधुदुर्गात पूरस्थिती गंभीर
माणगावात वृद्ध बेपत्ता ः अनेक भागांत पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ७ : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बांद्यासह जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने दाणादाण उडाली. खारेपाटणला पुराचा वेढा पडला आहे. मुंबई-गोवा महामार्गासह अनेक राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे काही कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, माणगाव येथील एक वयोवृद्ध पुराच्या पाण्यातून वाहून गेले आहेत. मालवणमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या २० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळी अकरानंतर सर्व तालुक्यांमध्ये संततधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली होती; परंतु, आजच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे या नदीचे पाणी बांदा बाजारपेठेत शिरले. संपूर्ण बाजारपेठेला व्हाळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्यामुळे व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली. अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. या भागातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील आळवाडी परिसर पूर्ण पाण्याखाली गेला. मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी, इन्सुली येथे पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक अडीच तास ठप्प झाली. याशिवाय बांदा-आंबोली मार्गावरील विलवडे, वाफोली येथे रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. बांदा-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली. सावंतवाडी शहरात देखील गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला मुसळधारेचा मोठा दणका बसला. या भागातील बहुतांशी मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या भागातील २७ गावांचा संपर्क तुटला. माणगाव येथील दत्ताराम भोई हे वयोवृद्ध आंबेरी पुलावरून वाहून गेले आहेत. कुडाळवरून माणगावकडे जाणाऱ्या बहुतांशी सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या भागातील शेकडो एकर भातशेती देखील पाण्याखाली गेली. कुडाळ शहरात देखील ठिकठिकाणी पाणी साचले होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कसालमध्ये पुराचे पाणी काही घरांमध्ये शिरले. त्यामुळे त्या कुटुंबाचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. वेंगुर्ले तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले. येथील तुळस नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक मार्ग पाण्याखाली गेले. वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील होडावडा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तळवडे बाजारपेठेत पाणी साचले. येथील शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे.

कणकवली तालुक्यात देखील पूरस्थिती आहे. तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठेत सायंकाळी उशिरा पुराचे पाणी भरण्यास सुरूवात झाल्याने व्यापाऱ्यांची ताराबंळ उडाली. कासार्डे येथील पोलिस दूरक्षेत्राला पुराच्या पाण्याने वेढले आहे. कणकवली येथे देखील ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वैभववाडी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे येथील शुक आणि शांती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील अभिनव विद्यामंदिर आणि वाभवे प्राथमिक शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले होते. मात्र, शाळेला सुटी असल्यामुळे अनर्थ टळला. तालुक्यात वैभववाडी-उंबर्डे आणि वैभववाडी-फोंडा मार्गावर ठिकठिकाणी पुराचे पाणी वाहत होते. मालवण आणि देवगड तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.


रेड अलर्ट
जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर उद्या (ता. ८) देखील हवामान विभागाने सिंधुदुर्गला रेड अलर्ट जाहीर केला आहे. सध्या सर्वच नद्या धोका पातळीवर असल्यामुळे पावसाचे प्रमाण असेच राहीले तर जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाँईटर्स
* या वर्षातील सर्वाधिक पाऊस
* सिंधुदुर्गातील जनजीवन ठप्प
* मुंबई-गोवा महामार्ग तीन ठिकाणी ठप्प
* आंबेरी पुलावरून एकजण वाहून गेला
* काही घरांमध्ये पुराचे पाणी
* बांदा, खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी
* जिल्ह्यातील बहुतांशी राज्यमार्ग ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com