शिक्षण सेवक वेतन आणखी वाढवणार

शिक्षण सेवक वेतन आणखी वाढवणार

95592

शिक्षण सेवक वेतन आणखी वाढवणार
दीपक केसरकरः विस्थापित शिक्षकांच्या लवकरच बदल्या
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ः शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी बांधील आहे. जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचे सोयीच्या ठिकाणी बदली करण्याचे आदेश लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार आहे. शिक्षण सेवकांचे वेतन अजूनही वाढवण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिले. सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्तेत अग्रेसर असल्याला अभिमान आहे. तो सतत उंचावत ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेडगे, राज्य संयुक्त सरचिटणीस म. ल. देसाई, उपशिक्षणाधिकारी आंगणे, राज्य कार्यकारणी सदस्य मृगाली पालव, जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण म्हाडगुत, जिल्हा महिला सेल सचिव सीमा पंडित, सदस्या श्रावणी सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष भिवा सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष गवस, सचिव अमोल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी संघामार्फत घेण्यात आलेल्या दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग आव्हाड २०२४ तालुकास्तरीय टॉप टेन विद्यार्थी गुणगौरव, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान, नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत, सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान, आंतरजिल्हा बदली झालेल्या सभासदांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अखिलचे शिलेदार व कवी मनोहर परब यांच्या विद्यार्थि निर्मित ''उमलते भाव संवेदन'' आणि ''कोरोना-लॉकडाऊन एक जीवनानुभव'' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच शिक्षक दत्ताराम सावंत यांनी लिहिलेल्या ''विज्ञान रंजन मनोरंजन'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून विजय गावडे, सचिव रुपेश परब, कार्याध्यक्ष अर्चना देसाई, कोषाध्यक्ष महेंद्र कोरगावकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर महिला सेल अध्यक्ष शुभेच्छा सावंत, सचिव रोशनी राऊत, कार्याध्यक्ष उज्वला गावडे, कोषाध्यक्ष प्रिया माधव यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून गणेश घाडी, रमेश शिंदे, संदीप मिस्त्री, विलास पाले, संतोष रावण, संजय बांबुळकर, अनिल मुळीक, प्राची ढवळ, विभागीय अध्यक्ष लक्ष्मण बरागडे, अरविंद सरनोबत, दत्तगुरु कांबळे, मंगेश देसाई, सहसचिव म्हणून दीपक राउळ, शितल गावडे, विजय शिंदे, निंगोजी कोकितकर, तंत्रस्नेही प्रमुख महेश सावंत व अमित टक्केकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून दत्ताराम सावंत व शाम कळसुलकर, सल्लागार म्हणून आर. बी. गावडे, गुंडू सावंत, नरेंद्र सावंत, नेहा सावंत, मृगाली पालव, संजय शेडगे, वंदना सावंत, अमोल पाटील, तेजस्विता वेंगुलेकर, मनोहर गवस यांची निवड झाली.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी म. ल. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीचे अध्यक्ष शेडगे, सचिव अमोल पाटील, कार्याध्यक्ष महेश पालव तसेच महिला सेल अध्यक्ष वंदना सावंत व सचिव तेजस्विता वेंगुळेकर, नेहा सावंत तसेच अखिलच्या सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

चौकट
शिक्षक समस्यांबाबत वेधले लक्ष
संघटनेच्यावतीने शिक्षकांच्या विविध मागण्या मंत्री केसरकर यांच्याजवळ सोपवण्यात आल्या. यामध्ये नवनियुक्त शिक्षण सेवकांचा शिक्षण सेवक कालावधी तीन वर्षावरून कमी करावा, जिल्ह्यातील रिक्त पदे भरावी, दोडामार्ग तालुका शिक्षण विभाग आस्थापना, पीएम पोषण शक्ती योजनेसाठी गॅस सिलेंडर व्यवस्था करावी, केंद्र स्थळ डाटा ऑपरेटर द्यावा, शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती ही एकच समिती ठेवून इतर समित्या रद्द कराव्यात, शनिवारच्या शाळेच्या वेळेत बदल करू नये आदी मागण्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com