पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका

पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका

Published on

पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका

वेर्णाजवळ झाड कोसळले ; पाच तास गाड्या उशिरा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सलग दोन दिवस काही गाड्या उशिराने धावत आहेत. करमाळी ते वेर्णादरम्यान पहाटेला ओव्हरहेड विद्युतवाहिनीवर झाड कोसळल्याने दिल्लीकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस सुमारे सहा तास तर नेत्रावती एक्स्प्रेस पाच तास उशिराने धावत होती.
कोकणासह गोव्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावर होत आहे. कोकण रेल्वेमार्गावर करमाळी ते वेर्णा सेक्शनमध्ये पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युतवाहिनीवर पावसामुळे झाड कोसळून पडल्यामुळे सोमवारीही कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित होती. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मार्गावरील अडथळा दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली. मागील दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस सुरू आहे. या घटनेमुळे अप् दिशेने धावणारी नेत्रावती तसेच एर्नाकुलम येथून दिल्लीला जाणारी मंगला एक्स्प्रेस सुमारे पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम झाला. रविवारी रत्नागिरीहून दिव्याला जाणारी सकाळी ५.३० वा. सुटणारी पॅसेंजर गाडी पेणपर्यंतच होती. या गाडीने प्रवास करणार्‍या कोकणवासियांचे हाल झाले. ही गाडी सकाळी नागोठणे येथे ११.३० वा. पोहोचली. तेथून पेणला जाईपर्यंत दुपारचे १.४५ वाजले. दोन वाजून गेले तरीही गाडी पुढे जात नव्हती. अचानक स्थानकप्रमुखांनी ही गाडी पुढे जाणार नसल्याची घोषणा केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. काहींनी जवळचे रामवाडी एसटी स्थानक गाठले; मात्र तेथील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे स्थानकात एकही गाडी जात नव्हती. सर्व प्रवासी पेण स्थानकात गेले आणि तेथून पुढील प्रवास सुरू झाला. या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.