काळसे-बागवाडीला पुराचा विळखा

काळसे-बागवाडीला पुराचा विळखा

95683
95684
95685
95687

काळसे-बागवाडीला पुराचा विळखा
घरे, शेती पाण्यात ः मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ होऊन रात्री अडीच वाजता काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. ऐन झोपेच्या वेळी बागवाडी ग्रामस्थांची तारांबळ उडाली. काही शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपली गुरे, वाहने, ट्रॅक्टर आदी वाहने सावधगिरी बाळगून रात्रीच होबळीचा माळ सातेरी मंदिर येथे सुरक्षित स्थळी हलविली; पण काही शेतकऱ्यांची गुरे अजूनही पुराच्या वेढ्यामध्ये अडकली आहेत.
आज सकाळपासून पाणी पातळीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काळसे धामापूरमधील शेती क्षेत्रात नांगरणीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १५ ते २० पॉवर टीलर पुराच्या पाण्याखाली अडकल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. लावणीसाठी काढून ठेवलेला तरवाही मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. सायंकाळपर्यंत पूरस्थिती आटोक्यात न आल्यास बागवाडीतील बहुतांश घरांमध्ये पुराचे पाणी घुसून मोठी वित्तहानी होऊ शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज पहाटेपासूनच प्रशासन यंत्रणा बागवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी सरसावली. ग्रामपंचायत, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, पंचायत समिती विभाग काळसे गावात ठाण मांडून आहेत. पूरस्थितीवर लक्ष ठेवून बागवाडी ग्रामस्थांना आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी सातेरी मंदिर परिसरात ठाण मांडून आहेत. तहसीलदार वर्षा झालटे यांनी आज सकाळी काळसे येथे भेट देऊन बागवाडीतील पूरस्थितीचा आढावा घेतला. स्थानिकांशी चर्चा करून त्यांना धोका न पत्करता सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. स्थलांतरितांची राहण्याची व्यवस्था नजीकच्या शाळेमध्ये केली असून, त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात येईल, असे सांगितले. पूरस्थिती अधिक गंभीर झाल्यास आवश्यक बोटी, लाईफ जॅकेट आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे, हेड कॉन्स्टेबल टी. जी. मोरे, पोलिसपाटील विनायक प्रभू यांनी स्थानिक रहिवाशी महेश कोरगावकर यांच्या होडीतून बागवाडीमध्ये जाऊन पूरस्थितीची पाहणी करत रहिवाशांना सतर्कतेचे आवाहन केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विहिरींमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार झालटे यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे, तलाठी नीलम सावंत, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, ग्रामसेवक पी. आर. निकम, सरपंच विशाखा काळसेकर, चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक एस. एस. चव्हाण, आरोग्य सहाय्यिका वाय. एस. सावंत, गौरी कसालकर, समुदाय आरोग्य अधिकारी डी. डी. शेवडे, कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल टी. जी. मोरे, सिध्देश चिपकर, पोलिसपाटील विनायक प्रभू, कोतवाल प्रसाद चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण भाटकर, श्री. सावंत यांच्यासह निवृत्त पोलिस कर्मचारी श्री. वालावलकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ भाऊ नार्वेकर व इतर उपस्थित होते.

चौकट
घरावर झाड पडून मसुरेत नुकसान
दरम्यान, मसुरे-देऊळवाडा पन्हळकर टेंबवाडी येथील किशोर परब यांचा घराच्या पडवीवर झाड पडून सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नुकसानीची पाहणी पोलिसपाटील नेवेश फर्नांडिस आणि कोतवाल संतोष चव्हाण यांनी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी परब यांना मदतीचा हात देताना घराच्या पडवीवरील झाड तोडून मोकळे केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com