बांद्यात पुराचे पाणी ओसरले

बांद्यात पुराचे पाणी ओसरले

95735
95736
95738

बांद्यात पुराचे पाणी ओसरले
पावसाची झोड कायम ः व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून मदतकार्य
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः बांदा शहरातील आळवाडी व गांधीचौक बाजारपेठेत रविवारी दुपारी शिरलेले तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओसरले. पाणी ओसरल्यानंतर येथील व्यापारी व नागरिकांनी साफसफाई मोहीम राबविली. उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा गाडी तसेच ग्रामपंचायत सफाई कर्मचारी उपलब्ध करत स्थानिकांना मदतकार्य केले. पुराच्या पाण्याने स्थानिकांना नुकसानीस सामोरे जावे लागले. आजचा आळवाडी येथे भरणारा सोमवार आठवडा बाजार कट्टा कॉर्नर येथे महामार्गलगत भरविण्यात आला. प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच राहिल्याने रात्री उशिरा पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रांताधिकारी हेमंत निकम व व तहसीलदार श्रीधर पाटील यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
तेरेखोल नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या परिसरात दुपारी पाणी नदीपात्राबाहेर येत लोकवस्तीत घुसले. दुपारीच शहरातील आळवाडी मच्छीमार्केट ते शिवाजी चौक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. आळवाडी येथील श्री साईबाबा मठापर्यंत पाणी आले होते. आळवाडीत पाणी घुसल्याने येथील दुकानदारांची तारांबळ उडाली. दरम्यान, येथील व्यावसायिकांनी स्थानिकांच्या मदतीने आपले किंमती सामान सुरक्षितस्थळी हलविले.
बांदा-आळवाडा भागात नेहमीच पुराचे पाणी येत असल्याने नागरिक सतर्क असतात. या पुराच्या पाण्यापासून बांदा मुख्य बाजारपेठ दूर असल्याने सुरक्षित राहिली. रात्रभर व्यापारी जागून सतर्क होते. ग्रामपंचायत, पोलिस, महसूल प्रशासन याठिकाणी ठाण मांडून पूरस्थितीचा आढावा घेत होते.
रात्रभर पावसाचा जोर असल्याने पुराचे पाणी या भागापर्यंत स्थिर होते. आज सकाळी पाऊस ओसरताच आळवाडा येथील पुराचे पाणी सकाळी ८ वाजता पूर्णपणे ओसरले. आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता; मात्र पूरस्थिती उद्भवली नाही. पाणी ओसरल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी दिवसभर साफसफाई मोहीम राबविली.
..............
चौकट
पाणी पातळीत अचानक वाढ
पावसाचा जोर कायम असल्याने सुरुवातीला ओसरलेले पुराचे पाणी रात्री ९ वाजता पुन्हा वाढले. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गांधीचौकात दीड ते दोन फूट पाण्याची पातळी वाढल्याने व्यापारी धास्तावले. अचानक पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांची सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी तारांबळ उडाली. यावेळी उपसरपंच सावंत, माजी उपसरपंच खतीब, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, नीलेश कदम यांच्यासह बाजारपेठेतील स्थानिक युवकांनी धाव घेत व्यापाऱ्यांना सामान हलविण्यासाठी मदत केली. रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी स्थिर होती. अखेर आज सकाळी पाणी पूर्णपणे ओसरले. पाणी ओसरल्यानंतर आळवाडी येथे दुकाने व घरांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
............
चौकट
आठवडा बाजार हलविला
बांद्याचा सोमवारी होणारा आठवडा बाजार हा आळवाडी येथे भरविण्यात येतो; मात्र याठिकाणी चिखलाचे साम्राज्य असल्याने आजचा आठवडा बाजार कट्टा कॉर्नर येथे महामार्गानजिक भरविण्यात आला.
..............
चौकट
बांदा-सावंतवाडी मार्ग १४ तासांनी खुला
बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली फॅक्टरीनजीक आलेले पुराचे पाणी सकाळी ओसरले. त्यामुळे हा मार्ग तब्बल १४ तासांनंतर वाहतुकीसाठी खुला झाला. बांदा-दाणोली मार्ग देखील ठिकठिकाणी पाणी आल्याने रात्रभर वाहतुकीसाठी बंद होता. आज सकाळी पाणी ओसरल्यानंतर हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com