पांग्रडमध्ये घरावर दरड कोसळली

पांग्रडमध्ये घरावर दरड कोसळली

Published on

९५७९२
९५७७९

पांग्रडमध्ये घरावर दरड कोसळली
सिंधुदुर्गात पुराचे सावट : अनेक घरांना पाण्याचा वेढा, ७२ कुटुंबांचे स्थलांतर
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला आज देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. काळसे-बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढले असून, येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पांग्रड होळीचे भरड (ता. कुडाळ) या ठिकाणी राहणाऱ्या अमरजीत भरलकर यांच्या घरावर डोंगराची दरड कोसळली; मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. आतापर्यंत ७२ कुटुंबांतील ३७० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुरामुळे शेकडो मालमत्तांचे आणि शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले. प्रशासनाकडून तातडीची मदत देण्याचे काम सुरू आहे. किनारपट्टी वगळता उर्वरित जिल्ह्यात पावसाचा जोर किंचित ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे.
जिल्ह्याला रविवारी (ता. ७) मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. सकाळपासूनच सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील तेरेखोल, कर्ली, भंगसाळ, सुख यापैकी काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, तर काही इशारा पातळीवरून वाहत होत्या. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. बांदा, खारेपाटण, कसाल, कुडाळ, सावंतवाडी शहरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खारेपाटणला पुराच्या पाण्याने वेढले होते. महामार्गासह जिल्ह्यातील बहुतांशी राज्यमार्ग ठप्प झाले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मालवणातील २० जणांना सुरक्षित बाहेर काढले, तर भेडशी येथे बोलेरोतून वाहून गेलेल्या तरुणांचा जीव स्थानिकांनी वाचविला.
जिल्ह्यातील किनारपट्टी वगळता उर्वरित भागात रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे त्या भागातील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली; परंतु मालवण, वेंगुर्ले आणि देवगड या किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर कायम राहिला. मालवण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. येथील कर्ली नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नागरिकांची तारांबळ उडाली. या पुराच्या वेढ्यामध्ये काही गुरे अडकली आहेत. पुराच्या पाण्याखाली १५ ते २० पॉवर टीलर सापडली असून, भातरोपे देखील वाहून गेली आहेत. काळसे बागवाडीला प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून, अधिकारी ठाण मांडून आहेत. वेंगुर्ले तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून या भागातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे.
पांग्रड होळीचे भरड येथे अमरजित भरलकर यांचे घर असून, हे घर डोंगराच्या जवळ आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर खचून भरलकर यांच्या घरावर दरड कोसळली. यात भरलकर यांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी धोका ओळखून या घरातील चार जणांना आधीच बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला; मात्र घराचे मोठे नुकसान झाले. घरातून नदीप्रमाणे पाणी वाहू लागले. घराच्या भिंतीही कोसळल्या.
जिल्ह्यात पुरामुळे आतापर्यंत ५७ घरांचे नुकसान झाले आहे. एक म्हैस वाहून गेली तर एका पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्यामुळे तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ७१ कुटुंबांतील ३७० नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले जात आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
किनारपट्टी वगळता अन्य भागांत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. बांदा बाजारपेठेतील पाणी ओसरले असून खारेपाटण शहरातील पाणी देखील कमी होऊ लागले आहे.


सर्वाधिक पावसाची
सावंतवाडीत नोंद
जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद सर्व तालुक्यांमध्ये झाली; मात्र सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवगड २१६.८, मालवण २२०.९, वेंगुर्ले २२४.५, कणकवली १८४.४, कुडाळ २१५.५, वैभववाडी १५६.६ व दोडामार्गात १६७.४ मिलिमीटर इतका पाऊस झाला.


बेपत्ताचा शोध सुरूच
कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी येथील दत्ताराम लाडू भोई हे काल (ता. ७) पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा आज दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. त्यांचा रेस्क्यू टीमद्वारे अद्याप शोध सुरू आहे.


३६६ जणांचे स्थलांतर
नदी, नाले, ओहोळाच्या पुराने धोका पोहोचलेल्या जिल्ह्यातील ३६६ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. कुडाळ तालुक्यातील गुढीपूर शेटकरवाडीतील ३० नागरिकांना नातेवाईक यांच्या घरी, टेंब धुरीनगर येथील २१ नागरिकांना नातेवाईक यांच्या घरी, बिबवणे येथील ३० नागरिकांना नातेवाईक यांच्या घरी, ओरोस ख्रिश्चनवाडी येथील २३५ नागरिकांना डॉन बॉस्को हायस्कूल, हॉटेल राजधानी आणि नातेवाईक यांच्या घरी, आंबेडकरनगर येथील ४५ नागरिकांना नातेवाईक यांच्या घरी तर कणकवली बोर्डवे येथील पाच नागरिकांना शेजारच्या घरी सुरक्षित हलविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.