आंबेरीतील नवा पूल वाहतुकीस खुला

आंबेरीतील नवा पूल वाहतुकीस खुला

Published on

९५९५०

आंबेरीतील नवा पूल वाहतुकीस खुला
‘बांधकाम’ला जाग ः नाईकांच्या इशाऱ्यानंतर एसटीला पत्र
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः अतिवृष्टीमुळे आंबेरी येथील जुन्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. एसटी वाहतूक पूर्णतः बंद झाली होती; मात्र याच ठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेल्या नवीन पुलावरून अद्यापपर्यंत वाहतूक सुरू न झाल्याने दोन दिवसांत पुलावरून वाहतूक सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबेरी येथील नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे पत्र एसटी महामंडळाला दिले. आज प्रत्यक्षात या पुलावरून एसटी वाहतूक सुरू झाली.
याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर यांनी आमकाल वैभव नाईक यांचे आभार मानले. तसेच पुलाच्या जोडरस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कविटकर यांनी दिल्या.
आमदार नाईक यांनी आंबेरी पुलासाठी बजेटअंतर्गत ६ कोटी २५ लाख रुपये मंजूर करून पुलाचे काम पूर्ण करून घेतले; मात्र त्यानंतर दोन वर्षांत सत्तांतर होऊन सत्तेत आलेल्या भाजपने पुलाच्या जोडरस्त्यासाठी आवश्यक असलेला ५० लाखांचा निधी दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनदेखील याकडे पालकमंत्री आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्यामुळे याचा फटका माणगाव खोऱ्यातील लोकांना बसला. येणाऱ्या दोन दिवसांत जोडरस्त्याचे काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा आमदार नाईक यांनी सोमवारी (ता. ८) दिला होता. अखेर आज नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे पत्र एसटी महामंडळाला बांधकाम विभागाने दिले.
त्यामुळे आंबेरी पुलावरून वाहतुकीचा प्रश्न सुटून माणगाव खोऱ्यातील नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर झाली आहे. यावेळी राजू कविटकर, एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, विभाग संघटक कौशल्य जोशी, उपसरपंच बापू बागवे, वसोली सरपंच अजित परब, माणगाव उपविभागप्रमुख एकनाथ धुरी, माणगाव ग्रामपंचायत सदस्य अवधूत गायचोर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.