वेंगुर्ले रुग्णालयातील समस्या दूर करा

वेंगुर्ले रुग्णालयातील समस्या दूर करा

Published on

95960

वेंगुर्ले रुग्णालयातील समस्या दूर करा
वालावलकर, येरमः बांधकाम विभाग, रग्णालय प्रशासनास बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १०ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील समस्या तत्काळ दूर करा. रुग्णांच्या वेळोवेळी तक्रारी येत आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा द्या, अशा सूचना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर व शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केल्या.
येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी श्री. वालावलकर व श्री. येरम यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली व रुग्णांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत खास बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. स्वप्नाली माने-पवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता श्री. केणी, उप अभियंता श्री. भगत, अधिपरिचारीका डिसोझा व औषध निर्माता (फार्मासिस्ट) उपस्थित होता.
बैठकीत सुरुवातीस उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी असलेली अॅम्बुलन्स शेड वाढविणे, रुग्णालयात गळती सुरू आहे, ती बंद करणे, शवागृहाची इमारत व पिलरला भेगा पडलेल्या आहेत. ते काम बांधकाम खात्याने त्वरीत करावे, एक्स-रे मशीन कँडी डिस्पेन्सरीच्या जुन्या इमारतीतून रुग्णालयात हलवणे, आदी कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत करावीत. एक्सरे टेक्नीशियन हा मंगळवार व शुक्रवारी आठवड्यातून दोन दिवस असतो. हे रुग्णांना समजण्यासाठी फलक लावावा. हा टेक्नीशियन दररोज उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करावा. याचप्रमाणे प्रसुती कक्ष व प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर असूनही प्रसुती महिलांना बाहेरच्या हाँस्पिटलला जावे लागते. त्यासाठी आँपरेशनसाठी भुलतज्ज्ञ नसल्याने आँपरेशनची सुविधा नसल्याने महिला याठिकाणी प्रसुतीसाठी दाखल होत नाहीत. रुग्णालयाच्या मागणीनुसार तसा पत्रव्यवहार केला असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. तसेच कोणी भुलतज्ज्ञ असल्यास आणि तो सेवा देणारा आढळल्यास प्रति ऑपरेशन मागे ४ हजार एवढे मानधन त्याने अर्ज सादर केल्यास मिळू शकेल, असेही स्पष्ट केले.
रुग्णालयात पाच डॉक्टर असूनही डॉक्टरची सेवा सर्वसामान्य रुग्णांना मिळत नाही. डॉक्टर जागेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे डॉक्टरांची ड्युटी निश्चित करून रुग्णांना सेवा देण्यात यावी. रुग्णालयात तपासणी केलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाप्रमाणे पूर्ण औषधे फार्मासिस्टकडून दिली जात नाहीत. याचे कारण विचारले असता, त्यावेळी औषध साठा कमी उपलब्ध असल्याने दहा दिवसानंतर पुन्हा औषधे घेण्यासाठी बोलावण्यात आल्याचे औषध निर्मात्या (फार्मासिस्ट) कडून सांगण्यात आले. यावेळी श्री. वालावलकर यांनी रुग्णालयास अत्यावश्यक औषधांचा साठा मिळतो का? या प्रश्नावर औषधे सर्व प्रकारची मिळतात, असे स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी प्रत्येक डॉक्टरांची ड्युटी व त्यांचे नाव निश्चित करून सेवा दिली जावी. रुग्णांना प्रत्येक वेळी रुग्णालयातील ड्युटीवरील डॉक्टर सेवा देण्यास सज्ज असलाच पाहिजे. ड्युटी करण्याऱ्या डॉक्टरचे नाव व ड्युटीची वेळ असा फलक तपासणीस आलेल्या रुग्ण व नातेवाईक यांच्या माहितीसाठी डॉक्टर रुम ठिकाणी लावावा, असे आदेश रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संदीप सावंत यांना दिले आहेत. तसेच रुग्णालयातील कुठल्याही कर्मचाऱ्याकडून चालढकलपणा, हलगर्जीपणा बेजबाबदारपणाची वागणूक रुग्णांना दिले जात असेल तर अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी श्री. येरम यांनी केली असता आतापासून अशी कारवाई केली जाईल, असे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले. रुग्णालयातील रुग्णांना पिण्याचे पाण्याबाबत श्री. वालावलकर यांनी विचारणा केली असता सध्या पिण्याचे पाण्यासाठी असलेले दोन्ही कुलरमध्ये बिघाड झाल्याने बंद पडल्याची माहिती देत ते दुरुस्त करूनही योग्यरित्या सेवेस उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे सांगितले. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.