चिपळुणात तरुणाने वार केल्याने ५ जखमी

चिपळुणात तरुणाने वार केल्याने ५ जखमी

Published on

तरुणाचा पाच जणांवर हल्ला

चिपळुणात पूर्ववैमनस्यातून प्रकार; हत्याराचा वापर

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः काही महिन्यांपूर्वी झालेला वाद पुन्हा उफाळून आला आणि रागाच्याभरात तरुणाने धारदार हत्याराने तब्बल ५ जणांवर सपासप वार करून त्यांना जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील बहादूरशेख नाका परिसरात घडली. या प्रकरणी संशयित युवराज शंकर पवार (३३, रा. खेर्डी दातेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युवराज पवार व फिर्यादी संकेश विश्वास उतेकर यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्यामुळे दोघांच्या मनात राग खदखदत होता. सोमवारी रात्री संकेश उतेकर हा आपल्या मित्राबरोबर बहादूरशेख नाका येथे एका माडी केंद्रावर बसला होता. त्याचवेळी युवराज पवार हा देखील त्या ठिकाणी आला. मागील घटनेबद्दल मला तुझ्याशी बोलायचे आहे. जरा ऐकून घे, असे त्याने संकेशला सांगितले; परंतु तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तुझ्याकडून मला काहीही ऐकायचे नाही. मी निघालो, असे म्हणत संकेश तेथून बाहेर पडू लागला. आपले म्हणणे ऐकून घेत नाही याचा राग युवराजला आला. त्याने वाद घालण्यास सुरवात केली. जोरदार बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात संशयित युवराजने धारदार हत्याराने सपासप वार करण्यास सुरवात केली. त्याने संकेश उतेकर यांच्यासह त्याच्या मित्रावरदेखील हल्ला चढवला. त्याचवेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्रावरदेखील त्याने वार करून रक्तबंबाळ केले. यामध्ये संकेश शंकर उतेकर (२५), श्रीराम धोंडू झगडे (२६), सागर राजेंद्र चिंदरकर (२४), प्रकाश भगवानराव मोरे (३९) आणि तन्वीर खेरटकर हे पाचजण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संकेश उतेकर याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी युवराज पवार याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ ताब्यात घेतले आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.