तेलींची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी

तेलींची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी

तेलींची अवस्था मावळत्या दिव्यासारखी
अशोक दळवीः केसरकरांवरील टिकेला उत्तर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः केवळ आमदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी राजन तेली खोटे आरोप करून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करत आहेत. संच मान्यतेची जुने कागदी घोडे नाचवून पुर्ण माहिती न घेता ते शिक्षकांची व नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. तेलींची अवस्था मावळत्या दिव्यासारखी झाली असून दिवा मावळायला लागतो तेंव्हा प्रकाश कमी होतो अन् वात जास्त फडफडते, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केली.
श्री. दळवी यांच्यासह महिला जिल्हा संघटक अॅड. नीता कविटकर, तालुका प्रमुख नारायण राणे, प्रेमानंद देसाई, भारती मोरे, बाबू कुडतरकर यांनी तेली यांच्या विरोधात पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे की, तेली ज्या संचमान्यतेच्या निर्णयाबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तो निर्णय केंद्राच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या आधारे असून हा शासन निर्णय करण्यापुर्वी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.
समितीच्या अभ्यासानुसार व शिक्षण आयुक्त यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच तो पारित करण्यात आलेला आहे. कोणताही शासन निर्णय काढताना तो सर्वसमावेशक व सर्वांना विश्वासात घेऊन शासकीय निकष आणि शासकीय धोरणाचा विचार करुन काढला जातो. त्यामध्ये काही चुकीचे असेल तर विहित पद्धतीने त्यात बदलही करता येईल.
संघटनेच्या मागणीनुसार त्यावर यापुर्वीच कार्यवाही सुरु झालेली आहे. यथावकाश त्यात नियमानुसार बदलही होईल. परंतु, तेली केवळ मंत्री केसरकर यांची बदनामी करणे व विरोध करण्याच्या हेतूने नाहक टीका करत आहे. जुने कागदी घोडे नाचवून पुर्ण माहिती न घेता आपली पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
शाळांचा गुणात्मक विकास असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध प्रकारचे उपक्रम असतील किंवा जर्मन भाषा शिकून जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रकल्प असेल, अशा अनेक संधी मंत्री केसरकर यांच्यामुळे जिल्ह्यातील लोकांना उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय असेल किंवा हजारोंच्या संख्येने शिक्षक भरतीचा निर्णय असेल, असे अनेक मोठे निर्णय मंत्री म्हणुन केसरकरांनी घेतलेले आहेत व त्याची अंमलबजावणीही सुरु आहे, असेही दळवी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com