सरबंळमध्ये नदी किनारा गिळंकृत

सरबंळमध्ये नदी किनारा गिळंकृत

Published on

96130
96131

सरबंळमध्ये नदी किनारा गिळंकृत
घरांना धोकाः अवैध वाळू उपशाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः सरंबळ येथे पूरस्थितीनंतर नदी किनाऱ्यालगतचा भाग कोसळू लागल्याने चार घरांना धोका निर्माण झाला आहे. कित्येक एकर शेतजमीन नदी गिळंकृत करत आहे. यासाठी संरक्षक बंधारा मंजूर होऊन दोन वर्षे उलटली तरी तो प्रत्यक्षात न आल्याचा फटका येथील स्थानिकांना यंदा अधिक तीव्रतेने बसला आहे. अवैध वाळू उपशामुळे हा धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्याचे काम त्वरित हाती न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यातील सरंबळ येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे अनेक एकर जागा नदीने केली गिळंकृत केली आहे. त्यामुळे उमेश कोरगांवकर, अंकुश वराडकर, प्रफुल्ल तोंडवळकर यांच्या घरांना निर्माण झाला आहे. येथे संरक्षक बंधाऱ्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर होऊन दोन वर्षे उलटली, तरी बांधकाम करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. बंधारा नसल्यामुळे कित्येक एकर जमिनीची धूप झाली. किनाऱ्यालगतची असंख्य झाडे नदीपात्रात गेली. अवैधरित्या बेसुमार सुरू असलेल्या वाळू उपशामुळे नदीपात्र रुंद झाले असून, त्यामुळेच जमीन कोसळत आहे. दिवसाला किमान १०० डंपर वाळूची वाहतूक करीत असतात. ना शासनाला महसूल, ना किनार्‍यावर राहणार्‍या लोकांना फायदा, अशी स्थिती असून, येथील रहिवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
गेले तीन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पुराचा धोका उमेश कोरगांवकर यांच्या घराला निर्माण झाला आहे. सोमवारी (ता. ८) घराचा एक खांब कोसळला असून, तातडीने कार्यवाही न झाल्यास पूर्ण घर नदी गिळंकृत करेल, अशी भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत १२ ते १४ माड, ४५ ते ५० सुपारीची झाडे, आंब्याची झाडे, केळीची झाडे यांचा नदीत खच पडला आहे, तर काही वाहून गेली आहेत. तर सुमारे ८ ते १० गुंठे जमीन नदीने गिळंकृत केली आहे. कोरगावकर यांची ५० हजार रुपये किंमतीची फायबर होडी वाहून गेली आहे.
पॉवर टिलर दोन दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले. अशाच प्रकारे अंकुश वराडकर, प्रफुल्ल तोंडवळकर यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. दत्ता वराडकर, बाळा तोंडवळकर, बापू तोंडवळकर, संतोष तोंडवळकर यांच्या घरात रात्री अचानक पाणी शिरल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. पाळलेली कोंबडी, भांडी वाहून गेली. धान्य भिजल्याने खराब झाले. अनेक पिढ्यांपासून जोपासलेल्या शेतजमीन, झाडे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे बांधकाम तातडीने न केल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी उमेश कोरगावकर, दत्ता वराडकर, संदीप कोरगावकर, प्रदीप चेंदवणकर, सुनील चेंदवणकर, सुरेश चेंदवणकर, बबन भाटकर, अरुण तोंडवळकर, संतोष तोंडवळकर, बाळा तोंडवळकर, रामदास तोंडवळकर, प्रल्हाद चेंदवणकर, भरत तोंडवळकर, मोहन कोरगांवकर, अर्जुन तोंडवळकर, सुरेश तोंडवळकर, गुरुदास चेंदवणकर, अमित वराडकर, नितीन नाईक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.