कामगारांना त्वरित ऑफलाईन लाभ द्या

कामगारांना त्वरित ऑफलाईन लाभ द्या

Published on

96128

कामगारांना त्वरित ऑफलाईन लाभ द्या
नारायण राणेः श्रमिक कामगार संघटनेने निवेदनाद्वारे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः बांधकाम कामगारांचे ऑफलाईन लाभ तत्काळ मंजूर करण्यासाठी श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. खासदार राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना अजून लाभ का मिळाला नाही, अशी विचारणा करत तत्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑफलाईन कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू होती. ही नोंदणी मंजूर झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या विविध लाभांचे अर्ज मंजूर होण्यासाठी २०१९-२० मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले होते. यापैकी एकूण ६४३२ लाभांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. या लाभांच्या अर्जाची रक्कम कामगारांच्या खाती जमा व्हावी, यासाठी कामगार आयुक्त श्री. आयरे यांच्यासोबत चर्चा करून पाठपुरावाही केला होता. त्या अनुषंगाने सरकारी  कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातून २० नोव्हेंबर २०२३ ला सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांना पत्र पाठविले होते; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे झालेले दुर्लक्ष व पाठपुरावा नसल्याने कामगारांच्या लाभाचे पैसे अनेक वर्षे मुंबई कार्यालयामधून त्यांच्या खात्यात जमा होत नव्हते, असे लक्षात आले. हे पत्र श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी स्वतः मागणी करून घेऊन पाठपुरावा सुरू केला.
या पत्राच्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण विविध प्रकारच्या १७ लाभांच्या योजनेसाठी ६४३२ अर्ज केले होते. यासाठी एकूण रक्कम ५ कोटी ९९ लाख ११ हजार ८०० रुपये एवढी रक्कम लागणार आहे. या पत्राच्या अनुषंगाने व पाठपुरावा करण्यासाठी प्राजक्त चव्हाण यांनी खासदार राणे यांच्याकडे निवेदन देऊन व सरकारी पत्रातून सविस्तर माहिती दिली. राणे यांनी आपल्या तत्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांकरवी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांना तत्काळ फोन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना अजून लाभ का मिळाला नाही, अशी विचारणा केली. हे लाभ तत्काळ मंजूर करावे, असे आदेश देण्यात आले. तसेच पत्रावर शिफारस करून पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यास सांगितले.

चौकट
कामगार सुविधा केंद्र तालुकानिहाय सुरू करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामगारांच्या हितासाठी व सोयीसाठी सर्व तालुक्यांमध्ये कामगार सेवा सुविधा केंद्र सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते देवगड तालुक्यांतील कामगार कार्यालयीन कामांसाठी ओरोस येथे येतात. त्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस वाया जातो. सेवा सुविधा केंद्र सुरू केल्यास कामगार त्यांना सर्व योजना व लाभ मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, मालवण अध्यक्ष दीपक देऊलकर, जिल्हा संघटक भूषण पाताडे व जिल्हा सहसचिव अंकुश चव्हाण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.