केसरकरांच्या घोषणा पोकळ

केसरकरांच्या घोषणा पोकळ

Published on

96353

मंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणा पोकळ
रुपेश राऊळ ः पंचायत समिती इमारत उभारण्यात अपयश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पंधरा वर्षे आमदारकी व मंत्रीपद भोगूनही साधे पंचायत समितीची तालुका इमारत उभारू शकले नाहीत. पंचायत समितीचा कारभार गोडाऊनमधून हाकावा लागतो, हे जनतेचे दुर्दैव असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा घोषणांचे पाऊस सुरू केला आहे. परंतु, त्यांच्या या घोषणा केवळ पोकळ आश्वासने आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.
श्री. राऊळ यांनी येथील ठाकरे शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांच्यासोबत यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गंवडळकर, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, कौस्तुभ गावडे, रश्मी माळवदे, प्राची राऊळ, रूपाली चव्हाण उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना एक मे १९८१ मध्ये झाली. त्यावेळी भाईसाहेब सावंत पालकमंत्री होते. त्यांनी जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास केला तो विकास आजपर्यंतच्या कुठल्या मंत्र्याला करता आला नाही. भाईसाहेब सावंत यांच्या योगदानाला प्रेरित होऊन आतापर्यंत होऊन गेलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जायला हवे होते. परंतु त्यांच्याकडून ते झाले नाही. ते सपसेल अपयशी ठरले आहेत. केसरकर यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री पद भोगले. परंतु, त्यांच्याकडून जनतेची निराशा झाली. पंधरा वर्षे आमदार व मंत्री असूनही ते सावंतवाडी तालुक्याची पंचायत समिती इमारत उभारू शकले नाहीत. केवळ पोकळ आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यांच्या याच आश्वासनामुळे पंचायत समितीचा कारभार जिल्हा परिषदेच्या गोडाऊनमध्ये अजूनही सुरू आहे, हे सर्वसामान्य जनतेचे दुर्दैव आहे. मुळात २०२१ मध्ये या पंचायत समितीच्या इमारतीचा आराखडा दोन कोटीचा असताना तो १६ कोटीच्यावर गेला आहे. याला केसरकरच जबाबदार आहेत.’’
श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या बाबतीतही केसरकर अपयशी ठरले आहेत. मुळात मडुरा की मळगाव अशा भांडणामध्ये या स्थानकाचा विकास खुंटला गेला. त्यानंतर टर्मिनसचा दर्जा मिळूनही पुढे त्याचा विकास न झाल्याने केवळ टर्मिनस असून नसल्यासारखे आहे. या ठिकाणी रेल्वेंना थांबा मिळत नाही. वेटिंग रूम व्यवस्थित नाहीत. या सर्व गोष्टींना केसरकरच जबाबदार आहेत."

चौकट
''बाहेरून रंगरंगोटी आतून पोकळ''
''बाहेरून रंगरंगोटी, आतून पोकळ'' अशी अवस्था सावंतवाडी टर्मिनसची आहे. टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांबा नाही. वेटिंग रूम तसेच प्रवाशांना सुलभ सुविधा नाहीत. तुतारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर लागते. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्या ठिकाणी जाणे येणे त्रासदायक ठरते. ती गाडी प्लॅटफॉर्म एकवर लागणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व समस्यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घ्यावी, असे आवाहनही यावेळी श्री. राऊळ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.