रत्नागिरी-रिफायरी समर्थनासाठी लवकरच भव्य मोर्चा

रत्नागिरी-रिफायरी समर्थनासाठी लवकरच भव्य मोर्चा

Published on

फोटो

रिफायरी समर्थनासाठी लवकरच मोर्चा
खासदार नारायण राणे ः महामार्ग होण्यासाठी ठेकेदाराला टाईमबॉण्ड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : रिफायनरी प्रकल्प येण्यासाठी नुसता प्रयत्न नाही, तर वातावरण निर्मिती करणार. पाऊस गेल्यानंतर रिफायनरीचे स्वागत करू. विरोधकांना जे समजायचे ते समजा; पण रिफायनरीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढू, असे खणखणीत प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले. रिफायनरी प्रकल्प होण्याच्यादृष्टीने पावले उचलल्याचे संकेत त्यानी दिले आहेत. नाट्यगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्ह्याची दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी माध्यम उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग व्यवसाय वाढविण्यात येणार आहेत. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांना चांगले शिक्षण देऊन कुशल केले जाईल, तर त्याला नोकरी मिळून उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प येण्यासाठी माझा नुसता प्रयत्न सुरू नाही, तर माझ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हा उद्योग आणायचाचा आहे. त्यासाठी वातावरण तयार करून पाऊस गेल्यावर रिफायनरीचे धणक्यात स्वागत केले जाईल. जिल्ह्यात जे उद्योग येतील ते आणणार. आधुनिक टेक्नॉलॉजी कशी येईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. जिल्ह्यात मोठ मोठे उद्योग आल्यानंतर आपोआपच विमानतळ सुरू होईल. मी २० दिवसांनंतर येणार आहे. तेव्हा याबाबतचा आढावा घेणार आहे.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण का रखडले आहे, याबाबतही अधिकारी, ठेकादारांना बोलवून माहिती घेणार आहे. त्यानंतर त्यांना टाईमबाऊंड दिला जाईल. त्याच कालावधित हा महामार्ग पूर्ण करून घेऊ. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी फाइव्हस्टार हॉटेलसह अन्य पायाभूत सुविधाची गरज आहे. पर्यटकांना काय आवश्यक आहे. त्यांची आवड, निवड, याचा विचार करून सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. तरच पर्यटन वाढणार आहे. सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी पर्यटन जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे.’’
जलजीवन मिशन योजनेबाबत काही तक्रारी आल्या आहेत. या योजनेचीही माहिती घेऊन दर्जेदार कामे कशी होतील, याबाबत प्रयत्न करू, त्याची चौकशी करू आणि राणे आले म्हणजे दर्जा आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.


पैसे मिळेपर्यंत प्रकल्पांना विरोध
कोणत्या प्रकल्पाने पर्यावरण खराब होईल, हे माहिती आहे. फ्रान्स, युरोप मी फिरलो आहे. तेथेही हे प्रकल्प आहे. तेथे काही झाले नाही; परंतु पैसे मिळेपर्यंत अशा प्रकल्पांना विरोध होतो. कोळशापासून वीज बनविणारे ५० कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला तर आमचा कोळसा कोणी घेणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी ५० कोटींची तडजोड झाली. त्यापैकी ५ कोट ठाकरेंना मिळावे, हे मी विधानसभेतदेखील रेकॉर्डवर बोललो आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्प गेला, असा आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.


विधानसभेच्या
दोन जागा घेणार
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी एकही भाजपचा आमदार नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीत २ जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहे; परंतु त्या कोणत्या ते आता सांगणार नाही; परंतु दोन जागा घेणार, अशी भूमिकाही राणे यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.