गुरा ढोरांचे गोठे पडले ओस

गुरा ढोरांचे गोठे पडले ओस

Published on

गुरा ढोरांचे गोठे पडले ओस
यांत्रिकीकरणाचा प्रभावः सेंद्रीय शेतीत शेणखताचा तुटवडा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ः वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गुरा ढोरांचे गोठे ओस पडू लागले आहेत. काही ठिकाणी आधुनिक पध्दतीने दुग्ध उत्पादनासाठी संकरित जनावरे पाळली जात असली तरी याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीचा प्रभाव वाढत असताना शेणखताचा तुटवडा जाणवेल, अशी स्थिती आहे.
सिंधुदुर्गात प्रामुख्याने भाताचे पीक घेण्याचे प्रमाण जास्त होते. पूर्वीच्या काळात बहुतांश घरी गाई, म्हैशी पाळल्या जात असत. त्यामुळे घरातच दुध उपलब्ध होत असे. घरात मातीच्या जमिनी असल्याने त्या सारवण्यासाठी शेणाचा उपयोग होत असे. तसेच शेणाचा वापर खत म्हणून शेतीसाठी केला जात असे. शेती कामासाठी बैलजोडी बाळगली जात असे. तत्कालीन स्थितीत कोकणातील वाहतुकीसाठी बैलगाडीचा प्राधान्याने वापर होत असे. त्यामुळे आपोआपच बैलजोडी आणि गाडी असे समीकरण असे. धान्य, लाकुड तसेच अन्य साहित्यासह बाजारहाट आणि जवळच्या प्रवासासाठी बैलगाडीचा सर्‍हास वापर होत असे; मात्र हळूहळू जग बदलत गेले आणि पारंपारिक गोष्टींची जागा यंत्राने घेतली. जग गतिमान होत गेले आणि पारंपारिक शेती मागे पडत चालली. काळानुरूप शेती परवडेनासे झाल्याचे कारण पुढे करीत कित्येकांनी शेतीचा नाद सोडला. तसेच नवीन पिढी शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहराकडे वळू लागली आणि गावाकडे मनुष्यबळ कमी पडू लागले. पर्यायाने शेतीकडे पाठ फिरवली गेली आणि आपोआपच पशुधन कमी होत गेले. अलिकडच्या काळात तर शेतीसाठी बहुतांश शेतकरी यंत्राचा वापर करू लागले आहेत. जमिन कोळपणी करण्यासाठी, शेतीमधील तण काढण्यासाठी तसेच भातपीक मळणीसाठी यंत्राचा वापर होऊ लागला आहे. काळानुरूप कुटुंबाचा विस्तार झाल्याने खेड्याकडील अनेकांनी वास्तव्यासाठी शहराकडे धाव घेतली. यातूनच गावातील संख्या कमी होऊ लागली आहे. पशुधन कमी होण्याची अनेक कारणे मानली जात आहेत; मात्र काहीही असले तरी ग्रामीण भागातील जनावरांची संख्या कमी होताना दिसत आहे. प्रशासकीय पातळीवर पशुगणना होत असते. पूर्वी गुरे असलेल्या गावामध्ये लसीकरण करण्यासाठी बराचवेळ जात असे; मात्र आता पशुंचीच संख्या रोडावल्याने हे लसीकरण काही तासात पूर्ण होत असल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांनी पारंपारिक गुरे पाळणे सोडून त्यामध्येही आधुनिकीकरण आणले आहे. भरपूर दुग्धोत्पादन देणाऱ्या संकरित जातीच्या गाई पाळणेही सुरू केले आहे. दिवसेंदिवस दुधाचे भाव वाढत असल्याने काहींनी हौसेने गुरे पाळल्याचे तसेच यातून आपला दुग्धव्यवसाय वाढवल्याचे दिसून येत आहे; मात्र हे जरी सत्य असले तरी गावागावामध्ये बैल, रेडे यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

चौकट
हिरव्या चाऱ्यात घट
वाढत्या तापमानवाढीमुळे जमिनीतील पाणी पातळीत घट होऊ लागल्याने हिरवा चारा कमी पडू लागला आहे. साधारपणे पावसानंतर याची मोठी समस्या भेडसावते. तसेच देवगड तालुक्याचा बहुतांशी भाग कातळाचा असल्याने चाऱ्याचे प्रमाण मुळातच कमी असते. त्यातच उन्हाळ्यात चारा कमी पडतो. याला येथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरते. तसेच कातळावर उगवणाऱ्या गवत तसेच चाऱ्यामध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक पोषणमुल्यांची कमतरता भासते. त्यामुळे असा चारा खाऊन जनावरे तितकीशी सुदृढ होताना दिसत नाहीत. तालुक्यात बहुतांशी जागा लागवडीखाली आल्याने तसेच विकसित झाल्याने जनावरांच्या चराऊ क्षेत्रावर मर्यादा आल्या आहेत. तसेच मासेमारीमध्येही आधुनिक बदल झाल्याने व्यवसाय वाढीकडे लक्ष केंद्रीत होऊ लागले आहे. परिणामी गुरे, शेळ्या पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचाही परिणाम येथील पशुधनावर होत असल्याचे चित्र आहे.

चौकट
दुग्धोत्पादनाकडे कल
अलीकडे विविध कंपन्याचे दुध बाजारात विक्रीसाठी येत असल्याने आपोआपच तयार दुधाकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यातूनच गुरे पाळणे आणि त्यांच्यावर खर्च करणे परवडेनासे झाल्याने आपोआपच दुभती जनावरे पाळण्याकडे कल कमी झाला; मात्र काही शेतकरी म्हैशी तसेच गीर गाई पाळून आपला दुग्धोत्पादन व्यवसाय वाढवत असल्याचेही दिसून येत आहे.
पशुधनाच्या बाबतीत शेतकऱ्यांनीही आता सजग झाले पाहिजे. निकृष्ट प्रतिची अनेक जनावरे पाळण्यापेक्षा उत्कृष्ट प्रतिची संकरित जनावरे पाळली पाहिजेत. तसेच आजारी जनावरे असल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत. यासाठी कृत्रिम रेतन पध्दती तसेच खच्चीकरणाचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जातो.

कोट
96338
दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत चालली आहे. बैल, रेडे यांची संख्या तुलनेत कमी झाली आहे. गाई, म्हैशी काही प्रमाणात आहेत. पूर्वी गुरे असलेल्या गावामध्ये लसीकरणासाठी बराचवेळ जात असे; मात्र अलीकडे काही तासातच गावागावातील लसीकरण पूर्ण होते. यंत्राचा वापर शेतीसाठी होत असल्याने गुरे कमी होत आहेत. सुमारे पन्नास टक्यांनी पशुधन कमी झाले आहे.
- डॉ. माधव घोगरे, पशुधन विकास अधिकारी, देवगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.