शाळा बंदचा सिलसिला यंदाही कायम

शाळा बंदचा सिलसिला यंदाही कायम

शाळा बंदचा सिलसिला यंदाही कायम
पटसंख्येचा अभाव ः १४६६ पैकी १०६ शाळांना टाळे
निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः सिंधुदुर्गात पटसंख्येअभावी सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचा आलेख यंदाही उंचावलेलाच आहे. यंदा बंद पडलेल्या शाळांच्या संख्येत २४ ने भर पडली आहे. गेल्या काही वर्षात १४६६ पैकी तब्बल १०६ शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. खासगी शाळांचे आकर्षण, घटलेली लोकसंख्या, सुविधांसाठी शहराकडे झालेल स्थलांतर ही याची प्रमुख कारणे असून रोजगाराच्या कारणामुळे मोठ्या शहरात स्थलांतर केल्याने दरवर्षी घटणारी विद्यार्थी संख्येचा प्रश्नही यंदाही कायम आहे. तालुक्याचे विद्यार्थी शहराकडे जात आहेत.
गावोगावी वाढलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, तुलनेने मराठी माध्यमांच्या शाळांची खालावलेली गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा अभाव, शिक्षकांची भरमसाठ रिक्तपदे आणि पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे जिल्हा परिषदेची शाळांची पटसंख्या खूपच कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या स्वयंघोषित शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतचा पट कमी झाला. अशी वस्तुस्थिती असतानाही मागील काही वर्षांत पुरेशा प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली नाही. अशी विविध कारणे यामागे दिसून येतात. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे जीवनात अनेक बदल घडून येत आहेत. अनेक खाजगी शाळा निर्माण झाल्याने त्याच्या आकर्षणापोटी मुले या खासगी शाळांकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील पालक मोठ्या शहराच्या दिशेने स्थलांतर करत असल्याने ग्रामीण भागात लोकसंख्या कमी होत आहे; मात्र यामुळे मुलांच्या कमतरतेमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भवितव्य धोक्यात असल्याचे चिन्ह आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील तब्बल १४६६ शाळांपैकी १०६ प्राथमिक शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी जिल्ह्याचा विकास तसेच खाजगी शाळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे.
जिल्ह्यात अनेक नवनवीन उद्योगांच्या घोषणा होतात; मात्र त्या सत्यात उतरत नाहीत. जिल्ह्यात रोजगार निर्मितीत आलेले अपयश लपून राहिले नाही. त्यामुळे स्थलांतरित होणारी कुटुंबाची संख्या प्रतिवर्षी वाढतच आहे. याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होत आहे. जिल्ह्यात नोकऱ्या नसल्याने ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील कुटुंबीय मुंबई किंवा गोव्यात स्थलांतरित होतात. याचा थेट परिणाम शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. खाजगी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाचा गाजावाजा केला जातो. याचा परिणाम म्हणुन खासगी शाळांचे आकर्षण वाढत आहे. यामुळे परिस्थिती नसताना देखील पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये भरती करत असल्याचे चित्र आहे. यामुळे भविष्यात या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तर हातावर मोजण्याइतकी देखील पटसंख्या नाही.

चौकट
बंद असलेल्या शाळा...
सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदच्या एकूण २०० शाळा आहेत. पहिली ते सातवीची एकूण पटसंख्या ५ हजार २०० आहे. तालुक्यात बंद असलेल्या शाळा अशा ः मळगाव कुंभार्ली, साटेली देऊळवाडी, तळवडे क्रमांक ७, तांबुळी क्रमांक २, बावळाट मुलांडा, मळेवाड क्रमांक ५, निगुडे क्रमांक ३, सातार्डा क्रमांक २, सातार्डा क्रमांक ३, सावंतवाडी क्रमांक ३, दाभीळ, शेर्ले क्रमांक ३, किनळे या शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्या आहेत.

कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोणताही रोजगार देणारा प्रकल्प सुरू नसल्यामुळे या ठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणात मोठ्या शहरांकडे स्थलांतरीत होतात. यामुळे शाळेतील पटसंख्या कमी झाली आहे. उद्योग नसल्याने कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहराकडे स्थलांतरित झाली आहेत. यामुळे त्या भागामध्ये मुळात लोकसंख्याच कमी आहे. लोकसंख्या टिकवण्यासाठी मुख्यतः जिल्ह्यात मोठे उद्योग असणे गरजेचे आहे.
- अनिल गावडे, पालक, सावंतवाडी

कोट
जिल्ह्यात पटसंख्येअभावी शाळा बंद पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र या शाळा बंद पडू नयेत यासाठी आम्ही शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. चांगलिया सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत शाळा बाह्य तसेच स्थलांतरीत मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांची शोध मोहीम सिंधुदुर्गात सुरू करण्यात आली.
- डॉ. गणपती कमळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com