लाच प्रकरण

लाच प्रकरण

Published on

‘सहाय्यक निबंधक’चा लिपिक
५० हजार लाच घेताना जाळ्यात
रत्नागिरीत सापळा ः सावकारी परवाना मागितली लाच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : सावकारी लायसन्सचे (परवाना) काम करून देण्यासाठी ५० हजार रुपये लाच मागणारा सहाय्यक निबंधक कार्यालयातील वर्ग तीनचा मुख्य लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या या कार्यालयात सापळा रचून सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. विनायक रामचंद्र भोवड (वय ५७, मुख्य लिपिक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी रा. ‘स्वामी’ त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे.
तक्रारदाराने सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सावकारी लायसन्सचे काम दिले होते; परंतु सावकारीचे लायसन देण्यासाठी संशयित लिपिक विनायक भोवड यांनी २६ जून २०२४ ला तक्रारदाराकडे आपल्यासाठी आणि डीडीआर ऑफिसला देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. याची पूर्ण शहानिशा झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक विभागात सकाळी ११.५६ वा. सापळा लावला. कार्यालयात पंचासमक्ष ५० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर आरोपी भोवड यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप ओगले, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलिस नाईक दीपक आंबेकर, कॉन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अनंत कांबळे याचा पुढील तपास करत आहेत.

नागरिकांना आवाहन...
जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ ०२३५२-२२२८९३ या फोन व ७५०७४१७०७२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.