बांद्यात महामार्ग कामावरुन वाद

बांद्यात महामार्ग कामावरुन वाद

Published on

९६४७८

बांद्यात महामार्ग कामावरून वाद
सटमटवाडी ग्रामस्थ आक्रमक ः समर्पक उत्तरे मिळेपर्यंत काम रोखणार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः बांदा-सटमटवाडी येथे महामार्गावर सुरू असलेल्या बोगद्याचे काम वैयक्तिक स्वार्थासाठी मूळ आराखड्यात बदल करून करण्यात येत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत प्रशासनाचे ठेकेदार, अधिकारी यांच्याशी लागेबंधे असल्याचा आरोप सटमटवाडी ग्रामस्थांनी आय येथे आयोजित विशेष सभेत केला. यावेळी सरपंच व प्रभाग एकमधील ग्रामपंचायत सदस्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची एकमुखी मागणी केली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांनी दिलगिरी व्यक्त करत चुकीची कबुली दिली; मात्र जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन समर्पक उत्तरे देत नाहीत, तोपर्यंत बांदा उड्डाणपूल व सटमटवाडी येथील बोगद्याचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
सटमटवाडी येथील बोगदा व सेवा रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच नाईक, उपसरपंच बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, शिल्पा परब, रेश्मा सावंत, रुपाली शिरसाट, देवल येडवे, श्रेया केसरकर, रत्नाकर आगलावे, साईप्रसाद काणेकर, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प समन्वयक अनिल सराफ, विक्रम रस्तोगीर आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरले. ही सभा वादळी झाली. बोगद्याचे काम चुकीचे असल्याचा आरोप केल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात वेळोवेळी शाब्दिक खडाजंगी झाली. जिवबा वीर व आनंद वसकर यांनी आतापर्यंत याठिकाणी अपघात होऊन ९ जणांचा बळी गेला आहे. ही अपघातांची मालिका खंडित होण्यासाठी याठिकाणी बोगदा होण्याची मागणी करण्यात आली. येथूनच डिंगणे, गाळेल व डोंगरपाल गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यासाठी २००९ मध्ये (कै.) श्रीधर पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईपर्यंत जाऊन हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी सटमटवाडीत जाण्यासाठी बोगदा व दोन्ही बाजूंनी सेवा रस्ता आराखड्यात मंजूर करण्यात आला आहे. मात्र, एका व्यक्तीच्या व ग्रामपंचायतच्या स्वार्थासाठी ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून वाडीतील १६ ग्रामस्थ्यांच्या फसवून सह्या घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यासाठी श्री. धारगळकर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला ग्रामस्थांनी विरोध करत ग्रामपंचायत प्रशासनाने स्वतःचा स्वार्थ बघत लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. बोगद्याचा आराखडा बदलून पूर्णपणे स्थानिक ग्रामस्थ व संघर्ष समितीला अंधारात ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आतापर्यंत सीमा तपासणी नाका, महामार्ग व कालव्यासाठी अल्प दराने शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. शासनाने एक रुपयादेखील नुकसानभरपाई दिलेली नाही. हा रस्ता व बोगदा ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनानेच दबाव आणून मूळ आराखड्यात बदल केल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायतने सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र देऊन बोगद्याच्या आराखड्यात बदल करण्याचे सुचविले. या पत्राची प्रत ग्रामस्थांनी सभेत दाखवत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामस्थांना अंधारात ठेवत कोणाच्या आशीर्वादाने व दबावाने तो आराखडा बदलण्यास सांगितले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी जर आपला प्रश्न मिटत असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचे सरपंच श्रीमती नाईक यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी आराखड्यात कोणताही बदल न करता मूळ आराखड्यानुसार काम करण्याची मागणी केली. मूळ आराखड्यात बोगदा व बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, आता सुरू असलेल्या कामानुसार केवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूकडेच सेवा रस्ता देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूने सेवा रस्ता रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. त्यामुळे मूळ आराखड्यानुसारच काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर सर्व ग्रामस्थ ठाम असून असे न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प समन्वयक अनिल सराफ यांनी यावेळी मूळ आराखड्यात दोन्ही बाजूला सेवा रस्ता असल्याचे मान्य करत ग्रामपंचायतच्या मागणीनुसार आराखड्यात बदल केल्याचे मान्य केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. केवळ एका व्यक्तीसाठी वैयक्तिक स्वार्थ न बघता ग्रामपंचायतने लोकांचा विचार करून कृती करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामपंचायतची ही कृती निषेधार्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सेवा रस्ता हा तीव्र उतारचा बनविण्यात आला असून याठिकाणी पूर्वीसारखेच अपघात होणार आहेत. त्यासाठी या सेवा रस्त्यांची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत कार्यकारी अभियंता दर्जाचे वरिष्ठ सक्षम अधिकारी येऊन समर्पक उत्तरे देत नाहीत, तोपर्यंत महामार्गावरील दोन्ही कामे बंद ठेवण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यावेळी बोगद्याला पर्यायी रस्ता रद्द करून सेवा रस्ता देण्यासाठी पत्र देणार असल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले. यावेळी अधिकारी सराफ यांनी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या लेखी द्याव्यात, या मागण्यांना मी वरिष्ठ कार्यालयात मागणीसाठी पाठवून देतो, असे आश्वासन दिले. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार, ग्रामपंचायत प्रशासन व सटमटवाडी ग्रामस्थ यांची संयुक्त चर्चा करण्यासाठी पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


...अन् अधिकारी निरुत्तर
महामार्गच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला २२.५० मीटर क्षेत्र अधिग्रहण केले असतानादेखील एका बाजूचा सेवा रस्ता हा निमुळता ठेवला आहे. ग्रामपंचायतच्या दबावामुळेच हे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत अधिकारी, ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासन यांनी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन पाहणी करण्याची मागणी केली. विशेष सभा झाल्यावर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झालेत. त्यामुळे केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.