पुतळा कोसळल्याप्रकरणी रचना सल्लागार अटकेत

पुतळा कोसळल्याप्रकरणी
रचना सल्लागार अटकेत
Published on

८२११

पुतळा रचना सल्लागार
चेतन पाटीलला अटक
नौदल अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याला आज पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्याला उद्या (ता. ३१) दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. दरम्यान, पुतळा कोसळण्यामागची नेमकी कारणे शोधण्यासाठीच्या मोहिमेला गती आली असून, नौदलाचे अधिकारी कॅप्टन प्रशांत कामत यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली.
पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर रचना सल्लागार डॉ. पाटील याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे डॉ. पाटील पोलिसांकडे स्वतःहून हजर झाले होते. सिंधुदुर्ग येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक कोल्हापूर येथे तळ ठोकून होते. आज डॉ. पाटील याला या पथकाच्या ताब्यात दिले. पथकाने त्याला येथील पोलिसांत हजर केल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्‍ज्ञ, आयआयटी, तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर आज नौदलाचे अधिकारी कॅप्टन कामत यांनी राजकोट येथे येत पुतळा दुर्घटनेची तपासणी केली. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करणार आहे. याच पार्श्वभूमीवर या समितीने आपल्या कामास सुरुवात केली आहे. शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामात प्रशासनाशी समन्वयक म्हणून भूमिका बजावणारे नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील यांच्यासोबत नौदलाच्या पश्चिम कमांडच्या गोवा बेसचे कॅप्टन प्रशांत कामत यांनी आज दुपारी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली. शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीत नेमकी कुठे चूक झाली, याबाबत ते तपास करीत असून, मिळालेली माहिती तांत्रिक समितीला सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, लवकरच आवश्यकता वाटल्यास तांत्रिक संयुक्त समिती म्हणून राजकोट येथे परिस्थितीची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com