मंगलमय दीपावली पर्व सुरू

मंगलमय दीपावली पर्व सुरू

Published on

-rat३१p३३.jpg-
२४N२२४८७
रत्नागिरी : दिवाळीच्या पहिल्या आंघोळीनंतर काजरघाटी येथील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
----------------

जिल्ह्यात दीपावलीचा अपूर्व आनंद

बाजारपेठेत तेजी ; देवदर्शन, दिवाळी मैफलींमुळे उत्साह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : आज जिल्ह्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात दीपोत्सवाला प्रारंभ झाला. आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि नवनवीन कपडे घालून देवदर्शन, फराळाचा आस्वाद घेत नरकचतुर्दशीने दिवाळीला सुरवात झाली.
गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. नरकचतुर्दशीच्या पहाटे लवकर उठून तेल, सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले. त्यानंतर कारेटे हे कडू फळ नरकासुराचे प्रतीक म्हणून पायाखाली चिरडले. फटाक्यांची आतषबाजी व पणत्या लावून दीपोत्सव करण्यात आला. अभ्यंग स्नान व त्यानंतर देवदर्शन आणि खमंग फराळाचा आस्वाद घेत दीपावलीला सुरवात झाली. शहरातील विविध मंदिरांना विद्युतरोषणाई व सजावट करण्यात आली आहे. आज सकाळी ग्रामदैवत श्री देव भैरी आणि रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
एकमेकांना शुभेच्छा देऊन आणि काही ठिकाणी दिवाळी पहाट मैफलींमुळे दीपावलीचा आनंद द्विगुणित झाला. अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करत दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या. दीपावलीचा मुहूर्त साधत नवनवीन कपडे, दागिने, कॉम्प्युटर, टीव्ही, फ्रीज, गाड्या, गृहोपयोगी वस्तू अशा अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी होणार आहे. यासाठी लकी ड्रॉ अशी आमिषे कंपनी व दुकानदारांनी ग्राहकांसमोर ठेवली आहेत.
---
आज लक्ष्मीपूजन
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १) लक्ष्मीपूजन होणार आहे. भारतीय संस्कृतीत लक्ष्मी ही समृद्धीची, संपदेची देवता मानली जाते. दारिद्र दूर होण्यासाठी व असलेल्या धनाची वृद्धी होण्यासाठी लक्ष्मीची पूजा करावी, असे धर्मग्रंथानी सांगितले आहे. लक्ष्मीपूजन हा दुकानदार, व्यापारी, उद्योजक, सुवर्णकार यांच्यासाठी मोठा सण आहे. या दिवशी जमा, खर्चाच्या वह्यांची पूजा केली जाते. हिशेबाची जुनी खाती बंद करून नवीन खाती सुरू केली जातात. २ नोव्हेंबरला पती पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दीपावली पाडवा (बलिप्रतिपदा), ३ नोव्हेंबरला भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक भाऊबीज साजरी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com