

भटकी कुत्री, भटक्या गाईंचीही होणार गणना
जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला प्रारंभ ; तीन महिन्याची प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : जिल्ह्यात २१व्या पशुगणनेला सुरवात झाली आहे. मोबाइल अॅपचा वापर करून ही गणना होणार आहे. या पशुगणनेत जनावरांच्या जाती, उपजातींचीही नोंद होणार आहे. ही गणना आजवरची अद्ययावत आणि पशुधनाची सविस्तर माहिती संकलित करणारी पशुगणना असणार आहे. भटकी कुत्री, भटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती संकलित करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुगणनेस सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरवात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या पशुधनाच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी, पशुपालकांकडील कौटुंबिक पशुधन, उद्योग, संस्था, संघटनांच्यावतीने पाळलेल्या गायवर्गीय, म्हैसवर्गीय पशुंसह मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की (कोंबडे-कोंबड्या, आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग ) आदींसह सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणी करण्यात येणार आहे.
-------
आकडेवारीत पारदर्शकता येईल
पशुगणनेत आतापर्यंत शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांचा विचार केला जात होता; मात्र गेल्या काही दिवसात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढलेले आहे. त्या जनावरांची नोंद झाली तर आकडेवारीमध्ये पारदर्शकता येईल तसेच पुढे योग्य ती कार्यवाही करणेही शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.