अतिघन आंबा लागवड फायद्यात

अतिघन आंबा लागवड फायद्यात
Published on

31622

अतिघन आंबा लागवड फायद्यात
डॉ. अमोल चौधरीः वेंगुर्ले येथे कार्यशाळेत बागायतदारांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ः आंबा हे कोकणचे उत्पन्न देणारे फळपीक आहे. हापूस आंब्याची झाडे १५ फुटांपेक्षा मोठी असल्याने त्यावरील खत, फवारणी, काढणी खर्च व निगा राखणे आदी खर्च मोठ्या प्रमाणांत वाढतो. त्यामुळे आंबा बागांचे पुनर्व्यवस्थापन करताना अतिघन आंबा लागवड बागायतदारांना फायदेशीर ठरणार आहे. अशा पद्धतीने आंबा पीक घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न तिपटीने वाढेल, असे प्रतिपादन जैन इरिगेशन सिस्टीम कोईमतूरचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. अमोल चौधरी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ शिरोडा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग यांच्यावतीने अतिघन आंबा लागवड व निर्यात आंबा लागवड याबाबतची कार्यशाळा प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे घेण्यात आली. आजच्या काळात अतिघन लागवडच बागायतदारांचे उत्पन्न वाढीचा मुख्य मार्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चौधरी यांनी केले.
वेंगुर्ले प्रोड्युसर कंपनीचे पीआरओ भूषण नाबर व एअरपोर्ट लिमिटेड कार्गो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा-गोवाचे जीएमआर पुरुषोत्तमसिंग ठाकूर यांनी विमानाद्वारे आंबा वाहतूक कशी करता येते, याचे मार्गदर्शन केले. विमानाने आंबा वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणांत वाचतो; मात्र त्याचे नियोजन आंबा बागायतदारांनी संघटितपणे करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी आत्माच्या ओरोस येथील प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, शिरोडा रोटरी क्लबचे अध्यक्ष जनार्दन पडवळ, ‘आत्मा’चे माजी पदाधिकारी सचिन दळवी, इन्व्हेंट चेअरमन रोटरीयन सचिन गावडे, सेक्रेटरी श्री एंटरप्रायझेसचे संचालक दत्तात्रय भोसले आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील ८० आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
यावेळी शिवराम आरोलकर, भूषण नाबर यांच्यासह काही शेतकऱ्यांनी जुन्या आंबा लागवडीमध्ये अतिघन लागवड करण्यासाठी उपाययोजनेबाबत विचारलेल्या शंकांचे निरसन बँकांचे अधिकारी तसेच कृषिखात्याच्या अधिकाऱ्यांनी केली. तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण यांनी आंबा बागायतीमध्ये उत्पादन व उपन्न वाढविण्यासाठी अतिघन आंबा लागवड आवश्यक आहे. शासनाच्या कृषी योजनांचा लाभ बागायतदारांना घेता येतो, अशी माहिती दिली. जिल्हा बँक व्यवस्थापक प्रमोद गावडे, बँक ऑफ इंडिया वेंगुर्ले शाखेचे व्यवस्थापक विनोद मोगली, अधिकारी सचिन मसूरकर यांनी बँकांकडून अतिघन लागवडीसंदर्भात अर्थसहाय्य कसे होऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिरोडा रोटरी क्लबचे पदाधिकारी सचिन गावडे यांनी केले. सूत्रसंचालन रोटरीचे माजी अध्यक्ष सचिन दळवी यांनी केले. शिरोडा रोटरी क्लबचे अध्यक्ष जनार्दन पडवळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com