मुंबई-गोवा महामार्गावरील वृक्ष लागवडीचा फार्सच! जिल्ह्यात १४ टक्केच कार्यवाही; दुभाजकातील झाडे सुकली, ठेकेदाराचे दुर्लक्ष
सुखकर प्रवासासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरण वेगाने केले जात आहे. काही टप्प्यातील काम पूर्णही झाले आहे; परंतु रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे उभी असलेली भलीमोठी झाडे तोडल्यामुळे महामार्गावरील प्रवास उन्हाच्या रखरखाटामध्ये करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी काही ठिकाणी वृक्ष लागवड सुरू केली आहे; परंतु त्याचा वेग अपेक्षित नाही. त्यामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील टप्प्यांमध्ये १४ टक्केच ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे.
८६ टक्के परिसरात दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आलेली नाही; मात्र वृक्षांची लागवड वेळेत न झाल्याने पुरेशा पाण्याअभावी ती सुकून गेली आहेत. त्याकडे ठेकेदारांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही लागवड केली असती तर नक्कीच ती जगली असती आणि लागवडीचा खर्चही वाया गेला नसता तसेच ज्या परिसरातील झाडे जिवंत आहेत त्यांचीही अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबई-गोवा हरित राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) बनवण्याचे स्वप्न अधुरेच राहिले असून, वृक्ष लागवडीचा फार्सच ठरला आहे.
वारंवार होणार्या अपघातांमुळे मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक झाल्यामुळे दहा टप्प्यात चौपदरीकरण सुरू झाले आहे. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले तर रत्नागिरी जिल्ह्यातील ३० टक्के काम अपूर्ण आहे. कोकणातील हा महामार्ग रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षराजी आणि झाडांमुळे पर्यटनासाठीच प्रसिद्ध होता. सावलीतून प्रवास करणे प्रवाशांना आल्हाददायक वाटत होते.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याजवळील आणि चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्याचा फटका महामार्गाने प्रवास करणार्या वाहनचालकांसह प्रवाशांना बसत आहे. दुतर्फा झाडी नसल्यामुळे या महामार्गावर दुपारी प्रवास करणे अडचणीचे ठरत आहेत. गेल्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे उन्हाच्या काहिलीने प्रवासी त्रस्त झाले आहेत. गावागावातील लोकं एसटीसाठी कडकडीत उन्हात उभे राहून प्रतीक्षा करत असतात. याकडे ना महामार्ग विभागाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे.
जिल्ह्यात १४ टक्के वृक्ष लागवड
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रडतखडत सुरू आहे. हे काम धीम्या गतीने सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीची गतीही कूर्मगतीने सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाचे करण्यात आलेल्या चौपदरीकरणात रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा अशी वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यात परशुराम ते आरवली, आरवली ते कांटे, कांटे ते वाकेड आणि वाकेड ते तळगाव अशा टप्प्यामध्ये सावर्जनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी लागवड केली आहे.
त्यामध्ये दुतर्फा ८८ हजार ८१ आणि मध्यभागी ११ हजार ३५२ असे ९९ हजार ४३३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी दुतर्फा ४ हजार २२४ आणि मध्यभागी ४ हजार ९६७ अशी एकूण ९ हजार १९१ वृक्षलागवड झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९ हजार ४३३ रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी केवळ ९ हजार १९१ रोपांची लागवड झाली आहे. सरासरी १४.२ टक्के कार्यवाही झालेली आहे.
महामागार्वर सावलीचा अभाव
गेल्या काही दिवसात तापमान वाढले असून, रत्नागिरी जिल्ह्यात तापमान ३६-३७ अंश राहिले आहे. महामार्गावर झाडांची सावली नसल्यामुळे रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत वाहनचालकांसह प्रवाशांना मार्गस्थ व्हावे लागते. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सावलीत विश्रांती घेण्यासाठी दुचाकीचालकांना थांबताही येत नाही. रणरणत्या उन्हाच्या चटक्यांमुळे त्रस्त प्रवासी कोणी सावली देता का सावली? असे म्हणत आहेत.
पाण्याअभावी झाडे गेली सुकून
महामार्गावर आरवली ते कांटे आणि वाकेट ते तळगाव या भागात दुभाजकांमध्ये झाडांची लागवड केलेली नाही. जिथे झाडे लावली आहेत त्यांना दररोज किंवा एक दिवसाआड पाणी दिले जात होते. त्यामुळे रखरखत्या भरउन्हात ही झाडे टिकून जिवंत होती. सध्या या झाडांना पुरेसे पाणी दिले जात नसल्यामुळे ती सुकून गेली आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने ही झाडे लावण्यात आली तो उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे झाडे लागवडीचा फार्सच ठरला आहे.
दृष्टिक्षेप
उद्दिष्ट लागवड पूर्ण टक्केवारी
दुतर्फा लागवड ८८०८१ ४२२४ ४.७९
मध्यभागी लागवड ११३५२ ४९६७ ४३.७५
एकूण ९९४३३ ९१९१ १४.२
अनेक ठिकाणी बसथांब्यावर प्रवासीशेड नाही. त्यामुळे प्रवाशांना रखरखत्या उन्हात तर पावसाळ्यात हातामध्ये छत्री धरून उभे राहावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा पूर्वी मोठमोठी झाडे असल्यामुळे प्रवास करताना फारसा त्रास होत नव्हता. आता झाडे तोडल्यामुळे हा त्रासदायक होत आहे. यावर संबंधित विभागांनी वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
- प्रतीक शिंदे, प्रवासी
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्जनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षलागवड सुरू आहे. काही झाडे सुकली आहेत ही वस्तुस्थिती असली तरीही तिथे नव्याने पुन्हा लागवड करण्यात येणार आहे. त्याची कायर्वाही सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा लागवड केलेल्या झाडांना पाणी देणे आणि त्यांचे संगोपन करणे ही जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
- राजेंद्र कुळकर्णी, उपअभियंता, सावर्जनिक बांधकाम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.