‘चढणीचे मासे चढले, चल धरुक जावया’

‘चढणीचे मासे चढले, चल धरुक जावया’
Published on

65835
65836

‘चढणीचे मासे चढले, चल धरूक जावया’

सिंधुदुर्गातील गावागावांत सूर; मासे पकडण्यासाठी खवय्यांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओहोळ भरभरून वाहू लागले आहेत. त्यामुळे पहिल्या पावसात मिळणारे चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्ये मंडळींनी नदी, ओहोळ परिसरात गर्दी करायला सुरुवात केली आहे. ‘चढणीचे मासे चढले, चल धरूक जावया’ असे प्रत्येक जण गावागावांत म्हणताना दिसत आहे.
पावसाळा सुरू झाला की, डोंगर-दऱ्यांतून नदीला मिळणाऱ्या पाण्यामुळे नदीचा प्रवाह पूर्ववत होऊन माशांना ताजे पाणी मिळते. या ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होऊन प्रवाहाच्या उलट्या दिशेने, तर काही प्रवाहासोबत पोहत जातात. नेमका हाच काळ माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मासे कमी पाण्याचे क्षेत्र शोधून तिथे अंडी घालण्यासाठी येतात. कमी पाण्यात येण्याच्या प्रयत्नात मासे शेताच्या पाण्यात आणि छोट्या ओहोळात येतात. हे मासे मिळविण्यासाठी लोक छोट्या ओहोळामध्ये आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागात माशांचे जाळे घेऊन मासे पकडण्यासाठी जातात. सध्या असेच मासे पकडण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. या माशांना बाजारातही चांगली मागणी आहे. छोटे मासे १०० ते २०० रुपये वाटा, तर मोठे मासे ४०० ते ५०० रुपये दराने विकले जात आहेत.
----
अन् नदी - नाल्यांवर होते गर्दी
साधारणपणे माशांचा उतरणीचा प्रवास उत्तरा नक्षत्रात तर चढणीचा प्रवास मृग नक्षत्रात असतो. वर्षानुवर्षांचा माशांचा प्रवास प्रत्येक पिढीला ज्ञात झाल्याने दोन्ही वेळेला खवय्ये मासे पकडण्यासाठी नदी - नाल्यांवर गर्दी करतात. वेगवेगळी जाळी वापरून मासे पकडले जातात. भरपूर पाऊस पडला की, शेतजमिनीतही पाणी साचते. ते पाणी ओहोळाच्या, नदीच्या दिशेने वाहू लागले की, नदी-ओहोळातील मासे शेतजमिनीतील कुणग्यामध्येही येतात. तेथेही अनेक जण मासेमारी करतात.
---
पाणवठे फुलले हौशा-नौशांनी
गोड्या पाण्यातील या मासेमारीदरम्यान खेकडे, टोळ, मळवे, काडय, ठिगूर, मरळ, वाळय, खवळे, फुरडे, शेंगडे, अळय अशा प्रकारचे मासे मिळतात. अनेकांना मासे खाण्यापेक्षा मासे पकडण्याची व पकडताना बघण्याची मोठी हौस असते. त्यामुळे पहिल्या पावसात ठिकठिकाणचे पाणवठे अशा हौशा-नौशांनी फुलून गेलेले असतात. पूर्वमोसमी पावसात सातत्य असल्याने सध्या सिंधुदुर्गातील गावागावांत, रस्तोरस्ती असे चित्र दिसत आहे.
----------------
...म्हणून म्हणतात चढणीचे अन् उतरणीचे!
मासे खालून वरच्या दिशेने जातात म्हणून त्यांना मासे चढले, असे म्हणतात. त्यामुळेच चढणीचे व उतरणीचे मासे असा शब्दप्रयोग केला जातो. पावसाच्या सुरुवातीला नदी-नाले दुथडी भरून वाहू लागतात तेव्हा मासे चढतात आणि नदीनाले कोरडे पडू लागले की ते उतरतात आणि अधिक पाणी असलेल्या सुरक्षित भागात जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com