आंबेरी शाळेच्या भिंती बोलू लागल्या

आंबेरी शाळेच्या भिंती बोलू लागल्या

Published on

swt243.jpg
72721
आंबेरी मळावाडी : शैक्षणिक चित्रांनी सजलेल्या भिंती शाळेतील मुलांना शिक्षणाची नवी दिशा दाखवत आहेत.

आंबेरी शाळेच्या भिंती बोलू लागल्या
मुलांना नवी दिशाः पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थांच्या मदतीतून रंगरंगोटी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः ‘अन् शाळेच्या भिंती बोलू लागल्या’ हे वाक्य आता मालवण तालुक्यातील आंबेरी मळावाडी शाळेसाठी अगदी योग्य ठरते आहे. पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहभागातून शाळेची भव्य रंगरंगोटी करण्यात आली असून, शैक्षणिक चित्रांनी सजलेल्या भिंती आता मुलांना शिक्षणाची नवी दिशा दाखवत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. विविध स्तरांतील लोकांनी आपापल्या परीने आर्थिक मदत करून या उपक्रमात योगदान दिले. जमा झालेल्या निधीतून संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. विविध विषयांवर आधारित शैक्षणिक चित्रे आणि संदेश भिंतींवर रेखाटण्यात आले. या चित्रांमध्ये पर्यावरण जागृती, गणिती आकृत्या, वैज्ञानिक उपकरणे, ऐतिहासिक प्रसंग आणि नैतिक मूल्ये यांचा समावेश असून, या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी विविध गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकतील, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. शाळेचे संपूर्ण वातावरण अधिक प्रेरणादायी आणि आकर्षक झाले आहे.
मुख्याध्यापक श्री. कदम यांनी वाडीतील लोकांची सभा घेऊन शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांनी एकजुटीने मदत करून शाळेचा कायापालट केला. सर्वप्रथम सर्वांनी एकत्र येऊन शाळेभोवती असणारी धोकादायक झाडे श्रमदानातून काढून घेतली. जेसीबी लावून शाळेच्या पाठीमागे शालेय इमारतीस धोकादायक असणाऱ्या डोंगराची माती काढून मोकळी जागा तयार केली. यानंतर मुंबईत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून तसेच ग्रामस्थातून शैक्षणिक उठाव गोळा केला. या उठावातून शालेय रंगरंगोटी करून घेण्यात आली. यापुढे शाळेसाठी पक्की संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार बांधकाम करणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांत आनंद व शिकण्याची उत्सुकता वाढली असून, शाळा विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले गेले आहे. ही गावाच्या एकजुटीची आणि शैक्षणिक प्रगतीची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांनी सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोट
गावकऱ्यांच्या एकजुटीमुळेच आज ही शाळा खऱ्या अर्थाने बोलके शिक्षण मंदिर बनले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता दृश्य माध्यमातून शिक्षण देण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.
- चंद्रकांत कदम, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com