अकरावी प्रवेशाने विद्यार्थी बेजार
73296
अकरावी प्रवेशाने विद्यार्थी बेजार
पहिल्यांदाच ऑनलाईन प्रक्रिया; अपुऱ्या माहितीसह वीज, इंटरनेट विस्कळीत असल्याचा फटका
तुषार सावंत
ःसकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः अकरावीसाठी यंदापासून सुरू केलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची असुविधा, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांची नाकीनऊ होत आहे. शाळास्तरावर याबाबत कोणतेच मार्गदर्शन झाले नसल्याने दहावीचा निकाल उलटून दीड महिना होत आला, तरी अजूनही बरेच विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रमात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये चार वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली. मात्र, यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण राज्यात केंद्रीय प्रवेश प्रक्रियांद्वारे केली. मुळात ग्रामीण भागांचा विचार न करता या वेळापत्रकाचे निकष आणि नियम राज्याने लादले आहेत. याचे कारण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना शाळा निवडीचा प्राधान्यक्रम देताना तब्बल दहा महाविद्यालये नोंदणी करावीत, असे अपेक्षित होते. मात्र, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्याच महाविद्यालयाचा पर्याय निश्चित केला आहे. पहिली यादी जाहीर झाली असून, आता दुसरी यादी २६ जूनला जाहीर होणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील जवळपास ८० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये शालांतर्गत म्हणजेच त्या संस्थेचा ‘इन हाउस कोटा’ हा दहा टक्के ठेवला आहे. तसेच व्यवस्थापनासाठी पाच टक्के कोटा आहे. मात्र, हा कोटा निश्चित असला, तरी इथेही गुणवत्ता यादीत लागणार आहे. महिलांसाठी ३० टक्के कोटा आहे. दिव्यांग आणि अपंग चार टक्के, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दोन टक्के, राष्ट्रीय खेळाडू ५ टक्के असे आरक्षण असून खुला प्रवर्ग, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ईसीबीसी व इतर सर्व प्रचलित आरक्षणासाठी कोटा निश्चित आहे.
मुळात म्हणजे यापूर्वी अकरावी प्रवेश घेताना पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येत होता. यंदा पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाल्याने, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात ऑनलाईन नोंदणी केली अशांनाच त्यात सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाणार आहेत, त्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. साहजिकच ही प्रवेश प्रक्रिया जून-जुलैमध्ये पूर्ण करावी, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा ही प्रक्रिया ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत लांबणार आहे. म्हणजे दहावीच्या निकालानंतर जवळपास ९० दिवस ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ग्रामीण भागांतील काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता आली नाही. कारण ही सुविधा बहुतांशी शाळांमध्ये नाही. काही शाळांनी स्वतःहून प्रवेश प्रक्रिया राबवून घेतली. त्यामुळे जवळपास ८० कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ग्रामीण भागांतील महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच ग्रामीण भागांत इंटरनेटची असुविधा, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठ्याचा फटकाही ऑनलाईन प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ८ हजार ७९० आहेत. मागील निकषानुसार सर्वसाधारण ८ हजार २६६ इतकी प्रवेश होऊ शकते. यातील काही विद्यार्थी आयटीआय किंवा खासगी आयटीआय किंवा अन्य क्षेत्रांकडे वळणार आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या मुलांना प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा आहे.
परंतु, केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने आणि किमान दहा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी नावनोंदणी असल्याने यात स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का? हाही खरा प्रश्न आहे. याचे कारण यंदा ज्या कनिष्ठ महाविद्यालयांची पटसंख्या निश्चित करून मान्यता दिली आहे, तितक्यात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. यापूर्वी एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयाला ८० पटसंख्येची मान्यता असली, तरी शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत होता. वाढीव प्रवेशार्थ्यांना माध्यमिक स्तरावर परवानगी दिली जात होती. मात्र, आता ह्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे पटसंख्येच्या कोट्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
राखीव आरक्षणाचा प्रश्न गंभीर
ग्रामीण भागांतील विद्यार्थी हे पंचक्रोशीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात. जिल्ह्याचा विचार केला असता खुला प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती वगळता इतर आरक्षणात बसणारे विद्यार्थी दुर्मीळच आहेत. परंतु, प्रवेश प्रक्रियेनंतर ज्या आरक्षण कोट्यामध्ये प्रवेश घेतले जाणार नाहीत, त्या कोट्यातील रिक्त असलेल्या जागांबाबत अद्याप कोणतेही मार्गदर्शन राज्यस्तरावर आलेले नाही.
प्रवेश कागदपत्रे कटकटीची
विद्यार्थ्यांना प्रवेश घेत असताना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे. बहुतांशी विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार कागदपत्रे नसतील, तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
...तर मग काय होईल?
अकरावी प्रवेशासाठी १० महाविद्यालये निवडणे आवश्यक आहे. पण, एखाद्याने तालुक्यातील तीन-चार महाविद्यालये निवडली असतील. पण, गावातील किंवा प्रवाशाच्या सोईचे महाविद्यालय मिळाले नाही आणि त्याने आपला प्रवेश निच्छित केला नाही, गुणवत्तायादीतील प्रवेशप्रमाणे मूळ कागदपत्र जमा केली नाही, तर त्याला प्रवेश मिळणार नाही. अशा मुलांना पुन्हा प्रवेश प्रकियेत सहभाग घेता येणार का? की त्याचे वर्ष वाया जाणार? असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे.
कोट
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नाही, त्यांना पुन्हा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार का? या प्रश्नाचे उत्तरही अद्याप सापडलेले नाही. याबाबत राज्यस्तरावरून कोणतेही मार्गदर्शन शाळा किंवा संस्थांना आलेले नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे काय करायचे, असा प्रश्न आहे. मुलांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
- सुमंत दळवी, प्राचार्य, मोहनराव मुरारी कनिष्ठ महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.