फणसही किफायतशीर ही जाणीव यायला हवीय

फणसही किफायतशीर ही जाणीव यायला हवीय

Published on

बोल बळीराजाचे ......................लोगो
(२१ जून टुडे ३)

आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या पलीकडे पारंपरिक मानसिकता जायला तयार नाही. फवारणी, खतं, मजूर, वानरमाकडं या समस्येनं हैराण माझा बळीराजा फणसावर अजून म्हणावं तसं प्रेम करायला तयार नाही. थाळीत-पिरशात आठळा भाजून खाताना दुसऱ्याच्या इष्टेटीच्या गप्पा होतात; पण बदलत्या निसर्गाचा निखारा त्याच्या टाचेखाली आलाय याकडे त्याचं लक्ष नाही. हापूस एके हापूसचे दिवस आता मागे पडले. कोकणच्या मातीत पिकणारी अनेकविध फळांची, निसर्गसंपन्नची ओळख आता जगाला करून द्यावी लागेल.

- rat२७p२.jpg-
P२५N७३४६२
- जयंत फडके, जांभूळआड पूर्णगड रत्नागिरी
----
फणसही किफायतशीर ही
जाणीव यायला हवीय
यंदा कोकम आणि फणस तसा मागस होता. त्यात पाऊस अंदाजापेक्षा पंधरवडाभर आधीच नगारे वाजवत दाखल झाला. वळीव वळीव म्हणता म्हणता पाहुणा म्हणून आला आणि जावईच झाला. या पूर्वमोसमी पावसानं माझ्या बळीराजाचे अतोनात हाल केले आणि नुकसानही केलं. त्यात फणसाची तर अजिबात वाट लागली. फणस तयार झाला; पण ओल्या झाडावर चढून फणस काढणं म्हणजे सुळावरची पोळी..माझा बळीराजा रोज उड्या टाकून जीव देणारे फणस असाहाय्यपणे बघतोय. कोकणी शेतकऱ्याला आळशी म्हणून हसणाऱ्यांनो हे नुकसान आणि दु:ख तुमच्या दृष्टीतरी पडते का?
तसा फणस व्यावसायिक दृष्टिकोनातून अजूनही दुर्लक्षित आहे. तशी आत्तापर्यंतची लागवडही आजोबांनी खाल्लेल्या आठळा रूजून आल्या म्हणून झाली आहे; पण फणस हे कोकणचं वैभव आहे. जगाच्यादृष्टीनं कापा, बरका असे दोनच प्रकार असले तरी अस्सल कोकणी बळीराजा प्रत्येक फणसाची वेगळी खासियत सांगू शकतो. भाजीचा, त्यातही कुसभाजीचा-सोलभाजीचा, सांदणाचा, तळायचा, साटाचा, खायचा, द्यायचा...किती प्रकार सांगू? पण फणस म्हटलं की, त्याच्या चेहऱ्यावर जी एक आनंदाची लकेर उमटते ना ती यावर्षीसारखे फणस जीव द्यायला लागले की नाराजीत, असाहय्यतेत बदलते. मग कशाला लावायची मुद्दाम झाडं. आहेत त्यांचंच काही होत नाहीये, असा नकारात्मक विचार बळावतो. मग काय करायचं तरी काय या फणसांचं?
फणसाचा पारा विक्रीयोग्य, कोवळ्या फणसाच्या कुसभाजीच्या योग्यतेचा असताना मोठ्या भाजीमार्केटमधे पाठवला तर नंतरचं डोक्यावरचं ओझं थोडं खांद्यावर येतं, हे खरंय; पण त्यात अडचणी आणि मर्यादा खूप आहेत. या प्रकारच्या फणसाची चिरलेली, वाफवलेली भाजी हवाबंद पॅकिंग करून ठेवली तर तिलाही मागणी आहे; पण त्याचं म्हणावं तसं मार्केटिंग अजून झालेलं नाही. जगात जाऊदे, देशात, राज्यात जरी ही भाजी पोचली तरी खूप होईल. तळलेले गरे म्हणजे फणस वेफर्स याला मात्र प्रचंड मागणी आहे. सगळ्यात जास्त फणस या तळणीसाठीच वापरला जातो. या वेफर्समधेही आता खूप फ्लेवर आलेत. अगदी फणसाचा वास डोक्यात जाणाऱ्यांनाही तळलेले गरे मात्र अगदी मिठाची जराशी चिमटी टाकूनही फार आवडतात. कापा फणस जगमान्य खायचा पिक्का फणस मानला जात असला तरी बरक्या फणसाचेही शौकीन काही कमी नाहीत. तयार फणसाच्या गऱ्याची भाजी, पीठ, अठळा यांचेही चाहते आहेतच. फणसपोळी आता सीझनल राहिलेली नाही. पिक्या फणसाचा रस हवाबंद डब्यात किंवा बाटलीत साठवून त्याची साटं दिवाळीनंतर आता बाजारात येतात. फणसाच्या पानापासून आठळापर्यंत प्रत्येक बाब वापरात येते. फणसाचं लाकूड टिकाऊपणा, चमकदारपणा यासाठी आपलं नाव अजूनही राखून आहे. तरी या कल्पवृक्षाची हौस म्हणून लागवड आणि व्यावसायिक लागवड यातलं अंतर कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातल्या अंतराएवढंच अपरंपार आहे. काही शेतकरी आपल्यापरीनं, कुवतीनुसार संशोधन, विकास, प्रसार यात काम करत आहेत.
फणसाचं चारखंड म्हणजेच साल, पात्या या सोलर ड्रायरचा वापर करून वाळवल्या तर बारीक करून पशुखाद्य म्हणून वापर होतो. कित्येक शेतकरी उशिरा होणारे फणस साकटून, वाळवून पावसाळ्यात जोताच्या बैलांना, इतर गुरांना खाऊ घालतात. यावर संशोधन आवश्यक आहे. फणस तसा कमी मशागतीत होणारा, हमखास दरवर्षी उत्पन्न देणारा माझ्या बळीराजाचा साथीदार आहे; पण....
वटपौर्णिमेला कवडीमोल दरानं शहरात जाणारे आणि सगळेच कापे असणारे फणस रस आटवून वर्षभर सांदण, आईस्क्रीम, बर्फी, फणसमोदक, फणसमाव्याची पुरणपोळीसारखी पोळीच्या रूपात लोकांपर्यंत पोचवावे लागतील. भाजलेल्या आठळीत असणारं बदाम-काजूगरापेक्षा सरस पोषणमूल्य जगासमोर आणावं लागेल. तळलेल्या गऱ्यांना नायट्रोजन पॅकिंगचं सुरक्षाकवच देऊन जगात पाठवायला हवं. फणसाची पाव गरगर फिरवून गायरीत टाकायचे. दिवस फणसावर यायला नको एवढं जागृत माझ्या बळीराजानं व्हायला हवं. शेकडो मार्गानं फणसाचं बाजारमूल्य वाढलं तर उड्या टाकून जीव देण्याची वेळ या कल्पवृक्षाच्या फळावर येणार नाही.

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com