‘बांदा-दाणोली मार्गाच्या गटारींची डागडुजी करा’
‘बांदा-दाणोली मार्गाच्या
गटारींची डागडुजी करा’
ओटवणे : बांदा-दाणोली या जिल्हा मार्गावरील बावळाट, सरमळे, विलवडे, वाफोली या गावातील जिल्हामार्गाचे गटार मातीने बुजले असून ते न उपसल्याने गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याचा फटका दुचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. बांधकाम खात्याने याची तत्काळ दखल घेऊन गटार उपसावेत आणि हा मार्ग वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी दुचाकीचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
या मार्गावरील गटार न उपसल्याने ते मातीने भरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याचा फटका वाहनचालकांसह सध्या शेतकरी वर्ग व पादचाऱ्यांना बसत आहे. भरधाव वाहनांमुळे पाण्याचे फवारे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांसह शेतकरी व पादचाऱ्यांवर पडतात. रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने त्याचा फटका वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. सध्या या जिल्हा मार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. याचाही फटका आंबोली आणि गोवा पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहनचालकांना बसत आहे. या जिल्हामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतूक करणे गैरसोयीचे झाले आहे.
----------
आचऱ्यात उद्या
गुणगौरव सोहळा
आचरा : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीतर्फे दहावी, बारावी गुणवंतांचा सत्कार सोहळा सोमवारी (ता. ३०) सायंकाळी ४ वाजता न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे आयोजित केला आहे. दहावी परीक्षेत आचरा परीक्षा केंद्रात पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा, बारावी परीक्षेत कला व वाणिज्य विभागात पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या, मराठी इंग्रजी विषयात केंद्रात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी अध्यक्ष अशोक कांबळी, सचिव जकारीयस फर्नांडीस यांनी केले आहे.
.................
पळसंबला बुधवारी
बुद्धिबळ स्पर्धा
मसुरे ः पळसंब येथील जयंतीदेवी सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, पळसंब आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब क्र. १ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवारी (ता. २) सकाळी ९ वाजता पळसंब शाळा क्र. १ येथे केले आहे. स्पर्धकांनी उद्यापर्यंत नावनोंदणी करावी. स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी गटात होणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे १५००, १०००, ५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत व मुख्याध्यापक विनोद कदम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.