रवींद्र चव्हाणांमुळे सिंधुदुर्गला पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षपद

रवींद्र चव्हाणांमुळे सिंधुदुर्गला पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षपद

Published on

74147


रवींद्र चव्हाणांमुळे सिंधुदुर्गला पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षपद

भाजप जिल्हाध्यक्ष सावंत ः जिल्ह्याच्या सुपुत्राकडे राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्राला अद्याप मिळालेले नाही. ती उणीव रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भरून निघणार आहे. उद्या (ता.१) त्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होणार आहे. हा सन्मान जिल्ह्यासाठी भूषण आहे. याचा प्रत्येक सिंधुदुर्गवासीयांना अभिमान आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सावंत बोलत होते. ते म्हणाले, ‘भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीची पूर्तता झालेली आहे. आज दुपारी १ ते ४ या वेळेत यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल होणार आहेत. यासाठी संघटनेचे राज्य परिषद प्रतिनिधी मतदान करणार आहेत. उद्या दुपारपर्यंत ही निवड जाहीर होईल. चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीला विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुमोदन दिले आहे. या निवडीवेळी भाजपचे राज्यातील हजारो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तालुकास्तरावर केले जाणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांनी यांच्या नियोजनासाठी ‘व्हीसी’ नियोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर चव्हाण जिल्ह्यात आल्यावर त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सदस्य आहेत. तसेच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. अशा एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण होत असल्याने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परिणामी पूर्ण जिल्हाभर आनंदोत्सव आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘चव्हाण यांची २५ वर्षांची कारकिर्द आहे. ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या चव्हाण यांनी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकवेळी राज्यमंत्री, तर मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम कॅबिनेटमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे प्रदेशाचे महामंत्री म्हणून कोकण विभागात चांगले काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली युतीचे कोकण विभागात ७ खासदार आणि ३९ पैकी ३५ आमदार निवडून आले आहेत. या कामगिरीमुळे महाराष्ट्रात भाजपचे १३७ आमदार निवडून आले. त्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना विद्यमान सरकारमध्ये मोठ्या खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाटत होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्यांना पक्ष वाढीची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. ते एक संघटन कुशल आणि संघटन शरण आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी अंगावर घेऊन काम करणारे आहेत. खासदार, आमदार या नेत्यांच्या निवडणुका झाल्या. मात्र, ज्यांनी या नेत्यांना निवडून आणले त्या कार्यकर्त्यांच्या आता निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक या निवडणुका आता होणार आहेत. त्यात शतप्रतिशत भाजप करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांना देण्याचे ठरविले आहे. त्यात ते यशस्वी होतील, असा विश्वास आहे.’
-------------------
कोकणाला फायदा
आमदार रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्याने कोकणाला फायदा होणार आहे. कोकणातील भाजप वाढीला ताकद मिळणार आहे. पुढील सर्व निवडणुकीत भाजप एक नंबर राहण्यास मदत होणार आहे, असाही विश्वास यावेळी श्री. सावंत यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com