थम्सअपला भारी कोकम सरबत..पण ..

थम्सअपला भारी कोकम सरबत..पण ..

Published on

बोल बळीराजाचे .......लोगो
(२८ जून टुडे ४)

जून महिना संपून जुलै उजाडला तरीही माझा बळीराजा आगप आलेल्या पावसाच्या नुकसानातून अजून सावरलेला नाही. झापावर पसरलेली कोकम, मध्येच थोडासा जरी उन्हाचा कवडसा पडला तरी वेड्या आशेनं उन्हात ओढायची आणि सरसरत सर आली की, पुन्हा आत पळवायची. ही गडबड घराघराच्या अंगणात कोकणात दिसतेय. एव्हाना मागस रतांबे केव्हाच पडूनझडून रोपं उगवायला लागल्येत. गेल्या काही वर्षातील कलमांची कोकम लागवड सोडल्यास धरती मोठी झाडंही अशाच बिया रूजून झालेय. मुद्दाम चांगल्या जातीची कोकमची कलमं ही विद्यापीठाची देन....फक्त ती वर्षानुवर्ष जगत नाहीत हा काजू कलमांसारखाच कटू अनुभव....; पण भरपूर डगळ रतांबा या कलमांनीच आणलाय हेही खरं..!!
- rat४p६.jpg-
P25N75193
- जयंत फडके
जांभूळआड पूर्णगड रत्नागिरी
----------
थम्सअपला भारी कोकम सरबत..पण ..
करवंद, आवळा, भोकरं, अननस, नारळ, सुपारी ही संपदा आंबा-काजूपुढे झाकोळली गेली असली तरीही पित्तशामक कोकम सरबत हे काही आजचं नाही. त्याला व्यापारी महत्त्व गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जरा जास्तच आलं, हे खरंय; पण उन्हाच्या झळा शिमग्यानंतर जाणवू लागल्या की, पन्हं आणि कोकम सरबत कोकणात घराघरात होत आलंय. आता त्याला ‘वेलकम ड्रिंक’चा दर्जा आलाय; पण ‘ताक नको जरा सरबतच दे काकू..’ ही काही आजची श्रीमंती नाही. चिमूटभर मीठ आणि रातंब्याच्या एका वाटीत राहील तेवढी साखर भरून चिनीमातीच्या बरण्या दादऱ्यांनी तोंड बंद करून केव्हापासून लाकडी फडताळात जाऊन बसतायत, हे कोक आणि थम्सअपच्या आजोबालाही सांगता येणार नाही. आता काळाच्या ओघात कोकम सरबत, आगळ, आमसुलं, गोड मसाला, चटण्या, कोकम तेलं यांची विविध रूपं आणि तितक्याच गरजा जगासमोर येतायंत.
काही हाताच्या बोटावर मोजता येतील, अशी मोठ्ठी नावं सोडली तर कोकमवर यांत्रिक प्रक्रिया अजूनतरी दिसत नाही. खरंतर, ज्यांच्याकडे अनलिमिटेड जागतिक मागणी आहे त्यांना ती पुरवता येत नाहीये आणि घराघरात दर्जा सांभाळून सरबत, अमसुलं होतायत. त्यांच्याकडे शाश्वत खरेदीदार नाहीयेत. कोणत्याही उत्पादनात दर्जा, गुणवत्ता आणि उपलब्धता यांचं नातं लक्ष्मी-सरस्वतीचं असतं तसंच काहीसं..ज्याच्याकडे भरपूर असतं त्यांच्याकडे ते दर्जात्मक, गुणात्मक असतंच असं नाही. लक्ष्मी नांदते तिथं सरस्वती वास करीलच असं नाही. सन्माननीय अपवाद जरूर आहेत; पण इथं लक्षात घ्यायला हवं की, ज्यांच्याकडे खूप मागणी आहे असे लहान लहान उत्पादकांकडून योग्य त्या दरानं या गोष्टी खरेदी करत नाहीत. खेकडा दुसऱ्याचे पाय ओढतो हे किती पिढ्या ऐकणार आता वर गेलेला खेकडा खाली राहिलेल्या दुसऱ्या खेकड्याचे पाय धरून त्याला वर ओढताना का दिसत नाही? ज्यांचं नाव मोठं झालंय त्यांनी आपल्याबरोबर काही शेतकरी बांधवांनाही उत्पादनासाठी प्रवृत्त करून दर्जा, गुणवत्ता जपून त्याच्याकडची उत्पादनं योग्य दरात विकत घ्यायला हवी. ‘आमच्याकडची कोकमं, सरबतं दिवाळी आधीच संपतात..’ या सांगण्यात आपल्याबरोबर दहा शेतकऱ्यांना मोठं करण्याचं आपण विसरतोय, हेही समजून घ्यायला हवं. जितकं वर जावं तितकं दुरदूरचं क्षितिज नजरेच्या टप्प्यात येतं म्हणतात. मग ज्यांना ते दिसतंय त्यांनी खड्ड्यात असणाऱ्यांना वर ओढून ते क्षितिज दाखवायला हवं.
सौंदर्यप्रसाधन उत्पादनात, औषध निर्माणात रतामतेलाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण त्याच्या उत्पादनाचा एकही कारखाना कोकणात नाही. रेडी टू ड्रिंकच्या जमान्यात तयार कोकम सरबत बाजारात सर्वदूर दिसत नाही. आता रासायनिक साधनांनी चव, रंग, वास यांनी प्रत्यक्ष उत्पादित वस्तूंची पुरती वाट लावल्येय. झाडावरच्या रातांब्याचा अमृत कोकमाशी काही संबंध आहे का? हा प्रश्नच आहे; पण मशिनमेड दूध आणि साचात बनणारे काजूगर फार काळ खवय्यांना फसवू शकत नाहीत. बाव्वनकशी सोनं शेवटी आपला आब टिकवून लाखाच्या घरात पोचतच. तसंच बाजाराच्या गरजा आणि स्वस्तच्या भुलभूलैयात चिनीमातीच्या बरणीतलं कोकम सरबत आणि सातपुटाची अमसुलं आपला आब राखूनच राहणार. शेवटी मुक्या माराची सूज आणि मेहनतीचं शरीरसौष्ठव यातला फरक अनुभवी डोळे लगेच पारखतात.
सहकार्य हा कोकणी बळीराजाच्या पाचवीला पुजायचा ‘शेंगदाणा’..आपण सगळेच ‘मी’च शहाणाच्या ‘चणे’ शिजवण्याची मिजास मारणारे..आता शासनही कोणतीही मोठी योजना समुहाला, गटाला देण्याच्या मानसिकतेत असतं. माझ्या बळीराजानंही नियम, अटीचं चिमूटभर मीठ आणि अनुदानाची वाटीभर साखर सहकार्याच्या बरणीत मुरत टाकली तरच लालचुटूक रतांब्याला रस सुटणार, हे स्वीकारायला हवं. नाहीतर, कोकमच्या बिया भैय्ये जमवणार आणि तेल कुठेतरी परप्रांतीय काढून आपल्याच थोबाडात मारणार..! काळाची पावलं ओळखून ‘मी’च शहाणाचं ‘आम्ही’च शहाणे झालो नाही तर आगळाची सोलकढी सातासमुद्रापार एखादा भलताच पोचवायचा..!!

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com