आषाढ वारी
(प्रासंगिक)
(टीप- विठुरायाचा फोटो वापरावा.)
आषाढ वारी
दमला असशीलना रे पांडुरंगा
वाट माझी पाहुणी
चालून नाही थकलो
भेट तुझी होईल म्हणूनी।।
पाय माझे थकले नाहीत
आस तुझ्या चरणाची
डोक ठेवीन म्हणतो मी
जरा चेपून देईन तुझे आधी ।।
भीड नव्हती पावसाची
त्या निसरड्या घाटाची
मुखी तुझे नाव विठ्ठला
शक्ती होती टाळ मृदुंगाची ।।
सावली ती माऊली मागे काऊनी
हात तुजे रिते देवा मंद हंसे मनी
राहीन मी उपाशी नामाहून तुझ्या
संसाराची माझ्या चिंता तू कर देवा ।।
देवा तुझ्या नामात दंग आम्ही सारे
चंद्रभागेतिरी नाचू बागडू आनंदे
मी तुझ्या दिंडीचा वारकरी
मनोमनी घडू दे अशीच आषाढवारी ।।
पण मला आषाढवारी कधीच करता आली नाही. वारीचे फोटो पाहिले काही मित्र, ओळखीचे लोक त्यांचे वर्तमानपत्रांमध्ये, सोशल मीडियावर फोटो पाहिले की, मी दरवेळी म्हणतो आपण देखील एकदा वारी अनुभवावी. डॉ. यशवंत पाठक यांची कित्येक व्याख्याने महाविद्यालयात मी ऐकलेली आहेत. डॉ. पाठक हे नाशिकमधील महाविद्यालयात प्राध्यापक होते. संतसाहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास. त्यांनी महाविद्यालयातील व्याख्यानात सांगितलेले मला आठवते की, ते दरवर्षी वारी करतात. माऊलीचे नाव घेत आळंदी ते पंढरपूर वारी करतात. वारी कशी करावी त्याचे वर्णन त्यांनी केलं. वारी करताना अंगावर एक सदरा लेंगा, खांद्यावर एक पंचा आणि खांद्यावर अडकलेल्या शबनम पिशवीत दुसऱ्या दिवशीचे बदलायला त्याच प्रकारच्या कपड्यांची एक जादा जोडी. बस एवढाच काय तो वारीसाठीचा ऐवज. अशाच पेहरावात वारीचा आनंद घ्यावा. ‘नको पैसाअडका, नको शिदोरी पांडुरंग देईल माधुकरी’ आपल्याला अशी वारी कधी करता येईल का आणि कळसावर वारकऱ्यांची वाट पाहणाऱ्या पांडुरंगाची भेट कधी होईल का? ही कास धरून नेहमी असतो.
पांडुरंगाचं आणि माझ नातं एक वेगळ्या प्रकारचं. माझ्या वडिलांनी ३२ वर्षे वारी केली. त्यांची वारी वेगळ्याप्रकारे असायची. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते गगनगडावरील आश्रमात सहभागी होऊन दुसऱ्या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात हजर असत. दरवर्षीचा हा त्यांचा शिरस्ता. एवढ्या गर्दीतदेखील पंढरपुरी एक पांडुरंगभक्त त्यांची सोय आपल्या घरी करत असे. एवढी लाख लाख वारकऱ्यांची दिंडी पाहून आम्ही त्यांना म्हणत असू, या गर्दीत तुम्ही राहणार कुठे? ते म्हणत, ‘पांडुरंगाने माझी सोय आधीच करून ठेवली असेल. तुम्ही काळजी करू नका. माऊली येणार असे म्हणत ते काका माझी वाट पाहत असणार आणि आल्यानंतर ते त्यांच्या घरी चुलीवरील गरमागरम भाकरी आणि खरड्याचं रसभरित वर्णन सांगत तेव्हा आमच्या तोंडाला पाणी सुटे. त्यांच्या लेखी कळसावर वाट पाहणारा तो पांडुरंग म्हणजे तो घरमालक होता. आनंदाचे डोई आनंद तरंग. तरंग ती स्पंदने त्यांच्या लेखी त्या घरात होती.
पांडुरंगाचे दर्शन मला मात्र पाहिजे तसं झालं. मी वडिलांना दरवेळी म्हणत असे, मी येतो तुमच्याबरोबर पंढरपूरला; पण मला पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला मिळाले पाहिजे. ते म्हणतं, पांडुरंग असा भेटत नाही. तुझी श्रद्धा असेल तर तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली देखील. प्राचार्य सुभाष देव सर, मी आणि माझा मित्र विजू सोलापूरला गेलो होतो. मी येताना सरांना म्हटलं, आपण पांडुरंगाचे दर्शन घेऊया. सरदेखील तयार झाले. एकाच्या ओळखीने जवळच्या रांगेने गेलो. गर्दी प्रचंड होती. आम्ही सभागृहात प्रवेश करायला आणि सभागृहाचा मुख्य दरवाजा बंद झाला. वेळ दुपारची होती. आश्चर्य म्हणजे सभागृहात प्रवेश करणारा मी शेवटचा होतो. पांडुरंगाला डोळे भरून पहिले पायावर नाक, तोंड घासले. मी पांडुरंगाकडे आणि पांडुरंग माझ्याकडे असा कित्येक वेळ एकमेकांना पाहण्यात गेला. सभागृहाची स्वच्छता होत होती. सभागृहातील भक्तांच्या पायीची धूळ मी मस्तकाला लावली. तुकोबारायांची गाथा डोळे भरून पाहिली आणि चक्क पांडुरंगाकडे एकटक पाहत जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे सभागृहात बसून होतो. माझ्या मनातील इच्छा माझ्या पांडुरंगाने पूर्ण केली. आता ओढ त्या वारीचा वारकरी होण्याची.
- बापू गवाणकर, काळबादेवी, रत्नागिरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.