दापोली - ‘कोकण दीपकाडी’वनस्पतीचे दापोलीत यशस्वी रोपण
‘कोकण दीपकाडी’ वनस्पतीचे दापोलीत यशस्वी रोपण
डॉ. मिरगळ यांचे प्रयत्न; आणखी १० ठिकाणी नैसर्गिक अधिवास
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ६ : कोकणातील दापोलीत जैवविविधतेचे सौंदर्य असलेल्या; पण नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या ‘कोकण दीपकाडी’ या दुर्मीळ वनस्पतीचा यशस्वी प्रसार डॉ. अमित मिरगळ यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाला आहे. डॉ. मिरगळ हे मुंबई येथे बिल्डिंग एन्व्हायन्कमेंट इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये पर्यावरणीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
‘एकदांडी’ म्हणूनही ओळखली जाणारी ही नाजूक वनस्पती केवळ पावसाळ्यात सड्यांवर फुलते; मात्र, तिचा मूळ अधिवास नष्ट होत असल्यामुळे ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. डॉ. मिरगळ यांनी २०१२ पासून या वनस्पतीवर संशोधन सुरू केले आहे.
दापोली तालुक्यातील विविध भागांत आतापर्यंत या वनस्पतीचे यशस्वी रोपण करण्यात आले असून, पुढील पाच वर्षांत आणखी दहा ठिकाणी नैसर्गिक अधिवास तयार करून दीपकाडीचा प्रसार करण्यात येणार आहे. या उपक्रमात ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ (देवरूख) आणि ‘वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू अॅन्ड रिसर्च’ (दापोली) या संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसहभागातून जैवविविधतेचे संवर्धन व्हावे यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देत त्यांना प्रत्यक्ष कामात सामावून घेतले जात आहे.
कोकणातील या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी जर कोणाला आपल्या कातळी जमिनीचा उपयोग दीपकाडीच्या संवर्धनासाठी करून द्यायचा असेल तर डॉ. मिरगळ, मिलिंद गोरिवले (दापोली), तुषार महाडिक (दापोली), मनीत बाईत (दापोली), सतीश दिवेकर (दापोली), प्रतीक मोरे (देवरूख), डॉ. प्रताप नाईकवडे (देवरूख)यांच्याशी संपर्क साधावा. लवकरच दीपकाडी संवर्धनविषयी जनजागृतीकरिता वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू अँड रिसर्च (दापोली) या संस्थेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोरिवले यांनी दिली.
चौकट
ईको-टुरिझमच्यादृष्टीनेही उपयुक्त
हा उपक्रम केवळ वनस्पती संवर्धनापुरता मर्यादित न राहता भविष्यात ईको-टुरिझमच्यादृष्टीनेही एक प्रभावी पाऊल ठरणार आहे. पर्यावरण आणि सामाजिक पातळीवरील हा समन्वित प्रयत्न कोकणातील जैवसंपदेचे रक्षण करण्यासाठी एक दिशादर्शक मॉडेल ठरू शकतो. सध्या दापोलीमध्ये अडखळ, महामाई नगर (बुरोंडी), वळणे, चंद्रनगर या ठिकाणी या वनस्पती रोपण करण्यात आले आहेत आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे यशस्वीदेखील झाला आहे.
कोट
योग्य प्रकारची हलकी माती, अर्धछायायुक्त हवामान आणि नैसर्गिक पाण्याचा निचरा यामुळे दीपकाडी पुन्हा बहरते. अशा योग्य ठिकाणांची निवड करून रोपण केल्यावर समाधानकारक यश मिळाले; परंतु यामध्ये शेतकऱ्यांनीदेखील सहभागी होणे आवश्यक आहे.
- डॉ. अमित मिरगळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.