धबधब्यांसह धरणांवर प्रशासनाचा ''वॉच''

धबधब्यांसह धरणांवर प्रशासनाचा ''वॉच''

Published on

- rat८p२०.jpg-
२५N७६१९०
रत्नागिरी ः तालुक्यातील पानवल येथील धबधब्याच्या ठिकाणी आनंद घेताना मुले.

धबधब्यांसह धरणांवर प्रशासनाचे लक्ष
ठिकठिकाणी फलक ; धरण परिसरात सुरक्षारक्षक, अतिवृष्टीवेळी मनाई
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : यंदा मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर जून महिन्यातही कायम होता. त्यामुळे चिपळूण तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे प्रवाहित झाले असून, धरणेही भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला चालना मिळाली आहे; मात्र अतिउत्‍साहाच्या भरात किंवा बेशिस्त वागण्यामुळे अनेकवेळा दुर्घटना घडतात. त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून धबधब्यांच्या ठिकाणी निर्बंध घातले आहेत तर पाटबंधारे विभागाकडून धरणांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. धरण परिसरातील अतिसंवेदनशील व जीविताला धोका ठरेल, अशा भागात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्‍यातील पर्यटनस्थळे आणि एक किलोमीटर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. तिथे जीवित व वित्तहानी होऊ नये तसेच सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, पर्यटकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात पेढे येथील सवतसडा, तिवरे, अकले, अडरे, कामथे घाट, परशुराम घाट आणि कुंभार्ली घाटासह तालुक्यातील अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे पावसाळ्यात नैसर्गिक पद्धतीने तयार होतात. तसेच काही गावांमध्ये धरणे पूर्णक्षमतेने भरलेली आहेत. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तिथे आपसूकच धबधबे तयार होतात. तिवरे, अनारी गावात हे अनुभव मिळत आहे. हे धबधबे सध्या गैरकृत्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा महाविद्यालयीन तरुण-तरुणी या धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी धाव घेतात. त्यांची स्थानिक ग्रामस्थांबरोबर वादावादीही होते. त्यामुळे त्या परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या सूचना तालुका प्रशासनाकडून दिलेल्या आहेत.

चौकट
धबधब्यांच्या परिसरात फलक
पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधबे, धरण परिसरात मद्यपान, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक किंवा मद्यविक्रीला मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणे, वळणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यावर निर्बंध घातलेले आहेत. सेल्फी काढताना काहीवेळी जीवावर बेतणारे स्टंट केले जातात, त्यासाठी हा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे तसेच खोल पाण्यात उतरून पोहणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्‍टिकच्या बाटल्या, थर्माकोलच साहित्य फेकणे, टिंगलटवाळी करणे, असभ्य वर्तन करणे, जलप्रदूषण टाळणे अशी कोणतीही कृती धबधब्यांच्या किंवा धरणाच्या एक किलोमीटर परिसरात करू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश (अत्यावश्यक सेवा वगळून) बंदी असून नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास कारवाई करण्यात येणार आहे, असे फलक पोलिस विभागाकडून धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

कोट १
समाधानकारक पावसामुळे लघुपाटबंधारे प्रकल्प भरलेले आहेत. काही ठिकाणी सांडव्यावरून पाणी जात आहे. त्यामुळे धरण परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. धरण परिसरातील अतिसंवेदनशील आणि सांडव्यातून पाणी वाहणाऱ्या परिसरात, जिथे पर्यटकांना धोका पोचू शकतो अशा ठिकाणी मनाई केली आहे; मात्र उर्वरित परिसरात पर्यटक जाऊ शकतात. अर्जुना, मुचकुंदी, चिंचवाडी, तिडेसारख्या प्रकल्पांच्याठिकाणी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत तर सीसीटीव्हीही बसवण्यात आलेले आहेत.
- विवेक सोनार, पाटबंधारे विभाग

कोट २
चिपळूण तालुक्यातील धबधबे आणि धरणावर कोणीही वर्षात पर्यटनासाठी अतिवृष्टीच्या काळात जाऊ नये, अशा सूचना आम्ही केल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी पर्यटक धबधब्यावर जातात. तेथे वाहनांची गर्दी होते आणि त्यातून अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे आम्ही आमचे दोन पोलिस कर्मचारी धबधब्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. तिथे कोणीही मद्यपान करू नये आणि कोणताही गैरप्रकार करू नये याची काळजी आम्ही घेतो. धबधब्यावरील बंदीचे प्रशासनाकडून आदेश आलेले नाहीत; परंतु सतर्कता म्हणून स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या आहेत.
- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक चिपळूण


कोट ३
जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पाण्याच्या जास्त प्रवाह असल्याने धोकादायक स्थिती असल्याची परिस्थिती नाही. पावसाचीही विश्रांती आहे. त्यामुळे धोकादायक धबधब्यांवर न जाण्याबाबत आम्ही सूचना केल्या आहेत; परंतु बंदीबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. गरज भासल्यास तसा निर्णय घेऊ. सध्या जिल्ह्यात मनाई आदेश लागू आहे.
- चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी

Marathi News Esakal
www.esakal.com