श्री गुरूपौर्णिमा

श्री गुरूपौर्णिमा

Published on

लोगो..............संतांचे संगती
(३ जुलै टुडे ३)
आज गुरूवार आहे. योगायोगाने आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे श्री गुरूपौर्णिमा आजच आहे. याच पौर्णिमेला श्री व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. मागील दोन लेखांमध्ये आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव या न्यायाने आई-वडिलांच्या सेवेची महती पाहिली. आता याच उपदेशातील तिसरा भाग आचार्यदेवो भव म्हणजे श्री गुरू हेच देव आहेत, असे मानून त्यांची सर्वस्वाने सेवा करणे याचा विचार करुया....!

P२५N७६३५२
- धनंजय चितळे
-----
श्री गुरूपौर्णिमा
भारतीय संस्कृतीत श्री गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रातील संत वाङ्मयाचा विचार केला तरीही प्रत्येक संतांच्या विविध रचनांमधून श्री सद्गुरू स्तवन वाचायला मिळते. श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूसेवा कशी करावी यावर दीडशेहून अधिक ओव्या लिहिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे,
इये शरीराची माती। मेळवीन तिये क्षिती।
जेथ श्रीचरण उभे ठाकती। श्रीगुरूंचे। श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ते श्री गुरूभक्तचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
म्हणोनी जाणतेने गुरू भजिजे। तेणे कृतकार्य होईजे। जैसे मुळसिंचने सहजे। शाखापल्लव संतोषती।।
श्री नामदेव महाराजांची श्रीविठ्ठल भक्ती किती श्रेष्ठ होती, हे आपल्याला माहित आहेच. तरीही आत्मज्ञानासाठी त्यांना विसोबा खेचर यांना गुरू करावेच लागले. श्री एकनाथ महाराजांची गुरूभक्ती त्यांच्या जीवनकथेतून जशी वाचायला मिळते तशी एकनाथी भागवतासारख्या ग्रंथातूनही ती व्यक्त होताना दिसते. श्री एकनाथ महाराजांचे ‘ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथाच्या नाथा तुज नमो’ किंवा ’गुरू परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू‘ असे अभंगही गुरूमहिमा सांगतात. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनाही स्वप्नात श्रीगुरू उपदेश झाला होता. माघ शुद्ध दशमी पाहूनी गुरूवार केला अंगीकार तुका म्हणे...या शब्दात त्यांनी कोणत्या दिवशी हा उपदेश झाला, याचे वर्णन केले आहे. श्री तुकाराम महाराजांनी भक्तजनांना ‘सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी’ असा उपदेश केला आहे. समर्थ श्री रामदास स्वामींनीही आपल्या दासबोधात सद्गुरू स्तवनाचा स्वतंत्र अप्रतिम समास लिहिला आहे. याशिवाय दासबोधात अन्य ठिकाणीही ते गुरूमहती सांगतात. याच ग्रंथामध्ये त्यांनी ‘सद्गुरू होऊन देव मोठा जयास वाटे तो करंटा ‘अशी स्पष्टोक्ती केली आहे; मात्र भोळ्याभाबड्या भक्तांनी भोंदू गुरूंपासून लांब राहावे, असेही ते आवर्जून सांगतात. असे खोटे, स्वार्थी साधू भेटले तरीही त्यांचा उपदेश घेऊ नये हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात, ऐसे गुरू आडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे! ग्रंथराज श्री दासबोधाप्रमाणेच मनोबोधातही त्यांनी गुरूमहात्म्य सांगितले आहे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी एका साकीमध्ये आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता कशात आहे आणि त्याचे फळ काय आहे, ते सांगताना म्हटले आहे.
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन
सद्गुरू चरण उपासिता।
महर्षी वेदव्यासांनी महाभारताची रचना केली. श्रीमद्भागवताची रचनाही त्यांनीच केली आहे. या विश्वातील सर्व गोष्टी, मानवी स्वभावाचे सर्व नमुने त्यांच्या लेखनात आले आहेत म्हणूनच त्यांचे कार्य सांगताना व्यासोच्छिष्टं जगत्त्रयं असे म्हटले जाते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
म्हणऊनि महाभारती नाही। ते नोहे लोकी तिही।
येणेकारणे म्हणिपे पाही | व्यासोच्छिष्टं जगत्त्रय||
केवळ आजचा दिवस नाही तर सर्वांनी श्रीसद्गुरूंच्या नित्य स्मरणात राहावे, अशी आपली संस्कृती सांगते. आपण सर्वांनी आजच्या परममंगलदिनानिमित्त श्रीसद्गुरूंना अनन्य शरण होऊन दंडवत करूया.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com