भातबियाणे बँक
जपुया बीज वारसा---------लोगो
(८ जुलै टुडे ३)
कोकणातील महाडी, सोनफळ, वालय हे लाल रंगांचे भात, धने साळ म्हणजेच जोंधळी जिरगा अथवा सफेद कोथिंबीर, चकहाओ (काळा भात), राजगुड्या, अश्विनी, जावयाची गुंडी, कमल, सोरटी, कोलम, झिणी, सोनामुखी अशा विविध जातींचे संकलन आणि संवर्धन करत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण तांदळांच्या शुद्ध बियाणांची निर्मिती करून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आदीम भातबियाणी बँक उभी केली आहे. यामधून ही बियाणी शेतकऱ्यांना कसण्यासाठी मोफत दिली जातात. या बँकेचा एकच नियम आहे, जितके बियाणे घ्याल त्याच्या दुप्पट बियाणी परत करणे. त्यामुळे ही बियाणी इतर अनेक शेतकऱ्यांना वापरायला उपलब्ध होतात. आजपर्यंत ५०० शेतकऱ्यांना या आदिम बियाणी बँकेचा लाभ मिळाला आहे.
- rat१४p७.jpg -
25N77407
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी,
सृष्टीज्ञान संस्था
-----
भातबियाणे बँक
हरितक्रांती ही त्या काळाची गरज होती; मात्र त्यामुळे संपूर्ण देशाचे अन्न एकसारखे होऊन गेले. अन्नातील स्थानिक विविधता नष्ट झाली. यात तांदळाचे कित्येक स्थानिक वाण नष्ट झाले. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ या जागतिक समस्या संपूर्ण जगाला भेडसावू लागल्या आहेत. याचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर झाला आहे. गेल्या वीस वर्षांत त्याने उग्र स्वरूप धारण केले आहे. तापमानात होणारी प्रचंड वाढ, पावसाची अनियमितता, पूर आणि दुष्काळ यांची वारंवारिता, पिकांवरील विविध रोग आणि किडी, गेली पन्नास वर्षे रासायनिक खते वापरल्याने गेलेला मातीचा कस, बियाणी-रासायनिक खते-कीटकनाशके यांच्या वाढत चाललेल्या किंमती आणि त्याचवेळी शेतमालाला न मिळणारा योग्य भाव याची परिणिती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली आपण पाहिली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कमी कसाच्या मातीत वाढणाऱ्या, पुराच्या पाण्यात किंवा पाण्याचा ताण सहन करणाऱ्या, रोगांना सहजी बळी न पडणाऱ्या, उत्पन्नाची हमी देणाऱ्या आणि मुख्य म्हणजे पोषणमूल्यांनी समृद्ध अशा स्थानिक तांदळाच्या जातींची आठवण झाली. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी तांदळाच्या स्थानिक प्रजाती शोधून वाढवायला सुरुवात केली. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल, ते डॉ. देबल देब यांचे. त्यांनी ओदिशामध्ये त्यांच्या ‘बसुधा’ या संस्थेमार्फत शेतकऱ्यांबरोबर काम सुरू केले आणि गेल्या २५ वर्षांत एक हजारांच्या वर तांदळाच्या विविध प्रजातींची बियाणे बँक तयार केली. त्यांना भैरब सियानी, बंगाल, सत्यनारायण बेलारी, केरळ, विजय झरदारी, उत्तराखंड, बाबूलाल दहिया, मध्यप्रदेश, किशोरभाई भट्ट, उत्तरप्रदेश, एस. बोरेगौडा कर्नाटक, दादाजी खोब्रागडे, महाराष्ट्रसारख्या शेतकऱ्यांची मदत झाली. त्याचबरोबर सहज समृद्ध, नवधान्य, बायफ, ऑरगॅनिक फार्मर्स असोसिएशन, आशा किसान स्वराज, फ्युचर अर्थ आशिया नेटवर्कसारख्या संस्था भारतातील शेतकऱ्यांमध्ये स्थानिक वाणांबद्दल जाणीवजागृती करत होत्या.
कोकणात लाल आणि पांढरा अशा दोन्ही प्रकारच्या स्थानिक तांदळाच्या विविध प्रजाती आढळून येतात. त्यापैकी काही लोकप्रिय प्रजातींमध्ये महाडी, सोनफळ, पटणी, वालयसारख्या प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातींचे दाणे सामान्यतः लाल आणि दाणेदार असतात. यांना कोणताही सुगंध येत नाही; मात्र मातीचा वास येतो. हे वाण त्याच्या उंच उंचीसाठी आणि त्यातील उच्च पोषणमूल्ये यासाठी ओळखली जातात. यात मोठ्या प्रमाणावर जस्त, लोह, रायबोफ्लेविन आणि अँटिऑक्सिडंटस् असतात. यात असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पोटाचे आरोग्य उत्तम राहते तसेच ग्लायसेमिक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते. त्याचप्रमाणे पांढऱ्या भाताचे वरगळ, दफ्तरी, झिणी, अश्विनी, मुणगा, खारा मुणगा, पंकज, पंकजघाटी, कोथिंबीरसारखे विविध वाण हे त्यांच्या गुणवैशिष्ट्ये टिकवून आहेत. यातील झिणी आणि अश्विनी हे रोजच्या वापरासाठी नाजूक साळ असलेले मोकळा भात होणारे वाण आहे. याच पार्श्वभूमीवर सृष्टीज्ञान ही संस्था गेली आठ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील, संगमेश्वर तालुक्यातील देवरूख भागात ‘आदिम भातबियाणी संवर्धन प्रकल्प’ राबवत आहे. या प्रकल्पाअंतर्गत स्थानिक आणि देशी भातबियाणांच्या वाणाची निर्मिती करत आहे.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)