देवगडात भात लावणीस पुर्णविराम
wt1714.jpg
N78141
देवगडः तालुक्यात भातशेतीमुळे परिसर हिरवाईने नटला आहे.
देवगडात भात लावणीस पुर्णविराम
वेळेआधी आलेल्या पावसामुळे फायदाः नाचणी लागवडही जवळपास अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ः यंदा वेळेआधी बरसलेल्या पावसामुळे शेती हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. तालुक्यातील सुमारे शंभर टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे, तर सुमारे ८० टक्के नाचणी लागवड पूर्ण झाली आहे. श्रावणाआधीच शेतीकामे उरकल्याने गावागावांतील सण, उत्सवांसाठी शेतकरी सज्ज आहेत. यंदा चतुर्थीही लवकर असल्याने त्यादृष्टीनेही तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
यंदाचा पावसाळी हंगाम मेपासूनच सुरू झाला. मेच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. साधारणतः २२ मे पासून सलग काही दिवस पावसाने किनारी भागाला चांगलेच झोडपून काढीत पूरसदृश स्थिती निर्माण केली. अवकाळीला जोडूनच मॉन्सूनही सक्रीय झाल्याने वातावरण पावसाळी बनले. वेळेआधी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मेमधील पाणी टंचाई तर दूर झालीच, शिवाय शेती कामाला सुध्दा वेळेआधीच सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने आतापर्यंत पावसाने सुमारे १६५० मिलीमीटरची आकडेवारी पार केली आहे. पावसामुळे भात पेरणी लवकर झाली. तरवाही वेळीच उगवून वर आल्याने भात लावणीची कामेही वेगाने पुढे सरकली. मध्यंतरी पावसाने काहीशी ओढ दिली होती. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडते आहे का, असे वाटत होते; मात्र दिवसाकाठी एखादी सर पडत राहिल्याने शेतकऱ्यांनी वेळेआधी लावणी उरकली.
तालुक्यात सुमारे ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी भात लावणी उरकली आहे. जवळपास शंभर टक्के भात लावणी पूर्णत्वास गेली आहे. तसेच तालुक्यात सुमारे २४० हेक्टर क्षेत्रात नाचणी पीक घेतले जाते. नाचणी पिकाला कमी पावसाची आवश्यकता असते. भात लावणी उरकल्यानंतर शेतकरी आता नाचणी लागवडीकडे वळले आहेत. आतापर्यंत सुमारे ८० टक्के नाचणी लागवड पूर्णत्वास गेली आहे. येत्या आठ दिवसांत तेही काम उरकेल. तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीची कामे उरकण्याबरोबरच बागायतदार शेतकऱ्यांची खत घालण्याची कामेही आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. शेती झाल्यावर कामगार आंबा बागायतीकडे वळतात. खत व्यवस्थापनही आता उरकेल.
चौकट
श्रावण महिन्यास २५ पासून प्रारंभ
शुक्रवारपासून (ता. २५) श्रावणास प्रारंभ होणार आहे. श्रावणात विविध धार्मिक सण, उत्सव असतात. गाव पातळीवर हरिनाम सप्ताह याच काळात असल्याने शेती कामे उरकल्याने आता शेतकऱ्यांना आता हरिनामाच्या जयघोषाची आस लागली आहे. यंदा ऑगस्टच्या अखेरीस घरोघरी श्री गणेशाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
कोट
तालुक्यात सुमारे ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात भातपीक तर २४० हेक्टर क्षेत्रात नाचणी पीक घेतले जाते. आतापर्यंत भात लावणी शंभर टक्के तर नाचणी लागवड सुमारे ८० टक्के पूर्ण झाली आहे. पावसाचे तालुक्यातील प्रमाण समाधानकारक असल्याने शेतीला पोषक पाऊस सध्या तरी पडत आहे.
- दिगंबर खराडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, देवगड
.............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.