‘शाळा पुन्हा सजेल, नव्या रंगात खुलेल’
78714
शाळा पुन्हा सजेल, नव्या रंगात खुलेल
माजी विद्यार्थ्यांची भावना; शिरगाव हायस्कूलला दीड लाखांची देणगी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः शिरगाव (ता. देवगड) हायस्कूलच्या दहावीच्या २०००-०१ च्या बॅचतर्फे शाळा इमारतीच्या एका वर्गखोली नूतनीकरणासाठी सुमारे १ लाख ५१ हजारांची देणगी दिली. देणगीचा धनादेश संस्था पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थाध्यक्ष अरुण कर्ले उपस्थित होते. दरम्यान, ‘शाळा पुन्हा सजेल, नव्या रंगात खुलेल आणि या नव्या रंगात जुन्या आठवणींच्या रंगांची उधळणही असेल,’ अशी भावना या वेळी काहींनी व्यक्त केली.
दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेत स्नेहमेळावा झाला. विद्यार्थी पुन्हा एकदा बालपणीच्या ‘त्या’ आठवणींत रमले. शाळेतील तत्कालीन शिक्षकांसमवेत आपले जीवनानुभव सांगितले. बॅचच्या वतीने शाळा इमारतीच्या एका वर्गखोली नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, शाला समिती अध्यक्ष विजयकुमार कदम, अधीक्षक संदीप साटम, संस्था कार्यकारिणी सदस्य अमित साटम, प्रकाश गोठणकर, तत्कालीन शिक्षक विजय वळंजू, श्री. आचरेकर, व्ही. डी. लब्दे, डी. एम. डवरी, दिलीप पाळेकर, मुख्याध्यापक एस. एन. आत्तार आदी उपस्थित होते.
संस्थापक-अध्यक्ष पुंडलिक कर्ले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सरस्वतीपूजन करून शाळेच्या वास्तूला वंदन केले. बाळकृष्ण लोके, सुहास खरात, आशीर्वाद कुबडे, रिझवान खान, शरद परब, धीरज वळंजू, स्वप्नील कदम, अपर्णा घाडी, अनिता लब्दे, जितेंद्र सावंत, पौर्णिमा पेडणेकर, योजना इंदप आदी उपस्थित होते. मान्यवरांना शाल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे संस्थाध्यक्ष अरुण कर्ले यांनी सांगितले. श्री. आत्तार यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, शाळेचे वर्ग केवळ भिंती नसतात, तर त्या नव्या स्वप्नांचे पंख असतात. त्या पंखांना बळ देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे त्यांच्या शाळेप्रती न संपणाऱ्या प्रेमाची साक्षच अशी भावना व्यक्त केली.