भातलावणीसाठी मुंबई, पुणेकर चिपळूणात

भातलावणीसाठी मुंबई, पुणेकर चिपळूणात

Published on

भातलावणीसाठी मुंबई, पुणेकर चिपळूण तालुक्यात
शेती बनतेय ग्लोबल ट्रेंडिंगचा विषय; समाजमाध्यमांमुळे प्रचार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : तालुक्यात भातलावणीची लगबग सुरू असून, शेतातून भलरीची गाणी कानावर पडत आहेत. येथील आशुतोष जोशी या तरुणाने पूर्वी गावापुरती मर्यादित असलेली भातलावणी आता समाजमाध्यमांद्वारे सर्वदूर पोहोचवली आहे. भातलावणीच्या रील्स आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यामुळे मुंबई, पुण्यातील चाकरमानी चिपळूणमध्ये येत आहेत. त्यांच्याबरोबर पर्यटक आणि सेलिब्रेटीही सहभागी होत असल्‍याने भातलावणी ग्लोबल ट्रेंडिंगचा विषय झाला आहे.
कोकणातील ग्रामीण भागात आजही भात हेच प्रमुख पीक आहे. शेतीत महत्त्वाची आणि कष्टाची कामे म्हणजे लावणीसाठी मनुष्यबळ, कष्ट लागतात. भातलावणीसाठी मजूर आणावे लागतात. ५००-७०० रुपये दिवसाची मजुरी असते याशिवाय श्रमपरिहार म्हणून मांसाहारी जेवणही असते. सर्वात जास्त दर नांगराचा असतो. नांगर व बैल भाड्याने आणल्यास एक-दोन हजार रुपये दिवसाचे भाडे आकारले जाते. एक एकर शेतात लावणी करायची झाल्यास किमान १५ माणसे व चार नांगरांची गरज असते. माखजन येथे सहकार पद्धतीने लावणी केली जाते. येथील पाध्ये आणि वहाळकर कुटुंबीयांच्या पुढाकाराने केल्या जाणाऱ्या सामूहिक शेतीसाठी ५२ माणसे आणि आठ बैलजोड्या एकत्र येतात.
पूर्वी खेडेगावात वर्दळ असायची, गावकरी एकमेकांकडे लावणीच्या कामाला जायची. एकमेकांना नांगर, बैल, अवजारे दिली जात त्यामुळे सहकाराच्या भावनेतून भातलावणीचा निपटारा होत असे. ही पद्धत अजूनही काही गावांमध्ये कायम आहे. आता शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. इरले-घोंगड्यांची जागा प्लास्टिक व रेनकोटने घेतली आहे. सहकाराच्या भावनेतही व्यवहार बघितला जात आहे. त्यातच पावसाचा लहरीपणा, नव्या पिढीने शेतीकडे फिरवलेली पाठ, नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेला लोंढा यामुळे शेती करणे अवघड होऊ लागले आहे. असे असले तरी भातलावणी आताही आता दूरवर पसरत आहे. कोकणातील अनेक तरुण आपल्या शहरी मित्रांसोबत खास भातलावणीसाठी गावात दाखल होत आहे. इतकेच नव्हे, तर माझ्या गावातील भातलावणी म्हणून समाजमाध्यमांवर व्हिडिओ, फोटो अपलोड करत आहेत.
जुन्या पिढीतील वयोवृद्धांच्या मुखातील भलरी गाण्यात नव्या पिढीचे सूर मिसळत आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव स्वतः कुटुंबासह भातलावणी करतात. पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर्षी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संगमेश्वरसह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या भातलावणी स्पर्धेला उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सामूहिक भातलावणी आणि नांगरणीच्या स्पर्धा झाल्या.

चौकट
भातलावणी शिबिराचा नवा ट्रेंड
निसर्गाच्या सान्निध्यात वावरता यावे, चिखलात घाम गाळावा अशी इच्छा असणारे आता लावणीसाठी गावात येत आहेत. भातलावणी शिबिर असा नवा ट्रेंडदेखील तयार होत आहे. भातलावणीच्या सहली पर्यटकांसाठी आयोजित केल्या जात असून, शिवारात बांधावर पर्यटकांना जेवणाचा आनंद दिला जात आहे. विशेष म्हणजे, उपक्रमाला शहरी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. लहान मुलांना पारंपरिक शेतीची पद्धत कळावी व मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा शेतात प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी सावर्डे येथे सह्याद्री शिक्षणसंस्था आणि खरवते येथील डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षणसंस्थेच्या मुलांना थेट भातलावणी शिकवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com