स्वच्छतेचा समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग...!
rat२७p२२.jpg-
८०२९२
प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा... लोगो
इंट्रो
प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील ओल्या कचऱ्यावर घरच्या घरी सेंद्रिय खतनिर्मिती करण्याचा संकल्प या चातुर्मासात केला तर नक्कीच स्वच्छतेतून समृद्धीकडे या ब्रीदवाक्याची प्रचिती प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही, याकरिता आजचा हा लेख प्रपंच...
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
------
स्वच्छतेचा समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग...!
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमलीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ती खेळत होती, असे सुंदर शब्द बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना त्या काळी सुचले. हे यथार्थ वर्णन आपल्या सृष्टीसौंदर्याचं आहे. श्रावणात सर्वत्र हिरवाईने दुलरी पसरलेली पाहायला मिळते. खूप छान असं हरितमय वातावरण झालेलं सर्वांना सर्वत्र पाहायला मिळतं; मात्र या हिरवाईच्या पलीकडे जाऊन जरा अलगद डोकावलं त्या वेळेला बालकवींनी जे पाहिलं ते खूप अतिशय किळसवाणे आणि मानवाच्या मला काय त्याचे आणि बेदरकार, बेधुंद, व्यक्तिमत्त्वाचे चित्र दिसले. ते त्यांनी पुढीलप्रमाणे त्यांनी शब्दांकित करून माझ्या स्वप्नात येऊन सांगितले आहे.
हिरवे पिवळे लाल गालिचे
प्लास्टिक तुकड्यांच्या जरतारीचे
त्या गलिच्छ मखमलीवरती....
राणी माशी ती घोंगावती
आजची अत्यंत कटू सत्य स्थिती या वरील चार ओळींमधून स्पष्ट होते. काहीअंशी स्वच्छताप्रेमींना वगळून उर्वरित सर्व मानवजातीला असलेल्या चुकीच्या सवयींचे चित्रण वरील चार ओळींमध्ये केलेले पाहायला मिळते. कचरा वर्गीकरण ही अत्यंत साधी, सोपी आणि वेळ न घालवणारी गोष्ट असून देखील; मला काय त्याचे..... या चुकीच्या मनोवृत्तीमुळे जगात सर्वत्र नदी, नाले, रस्त्याचे दुतर्फा आणि गावाच्या बाहेरील रस्त्याच्या बाजूला स्वतःहून केलेले डम्पिंग ग्राउंडचे चित्र पाहायला मिळते. हे चित्र केवळ आळस आणि मला काय, त्याचे या गोष्टीचे चित्र आहे; पण याच चुकीच्या सवयींमुळे सर्वत्र बकालता निर्माण झालेली दिसून येते. किंबहुना याचमुळे जल, जमीन आणि जंगल प्रदूषण झालेलं पाहायला मिळतं आहे.
कचरा मी करायचा आणि तो स्थानिक प्रशासनाने उचलायचा. मी कर देतो ना मग ते काम माझं नाही. मी कुठेही कचरा टाकेन, अशा उद्दाम विचारांमुळे आज बकालतेचा महाराक्षस सर्वच लहान-मोठ्या शहरांपासून, पर्यटनस्थळांपासून ते अगदी खेडेगावापर्यंत आपले हात-पाय पसरून घट्ट उभा राहिला आहे. या महाराक्षसाला परतवायचा असेल तर प्रत्येकाने कचराप्रश्नावर विचार करून कचरा ही माझी जबाबदारी असून, स्थानिक प्रशासनाला मी पूर्ण सहकार्य करेन, ही धारणा तयार करणे अत्यावश्यक आहे; पण यासाठी मी काय करायचं ०
प्रत्येकाला अनेक प्रश्न मिनिटा मिनिटाला पडत असतात; पण प्रश्नाच्या डोक्यावर उभे राहिले की, प्रश्नाचे उत्तर दिसतं; मात्र जर प्रश्नाला आपल्याभोवती पिंगा घालायला लावलं तर; मात्र आपण गर्तेतच अडकून पडतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण प्रश्नाच्या डोक्यावर उभे राहून पाहूया.
प्रत्येकाला शासन, प्रशासन टाहो फोडून वेळोवेळी सांगत आले आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा; मात्र तरीही आपण कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सर्व कचरा, अगदी शिजवलेल्या अन्नासहित भरून तिला एक करकचून गाठ मारून रस्त्याच्या दुतर्फा, नदी, नाले, गटार या ठिकाणी कोठेही भिरकावून देतो......पण यात आता आपल्याला बदल करायचा आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरीच सेंद्रिय खतनिर्मिती करणे अत्यावश्यक आहे. असे केल्यामुळे ओल्या कचऱ्याचा प्रश्न एका क्षणात मिटून जाईल; पण म्हणजे नक्की काय करायचे?
प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंब सदस्याने प्रथमतः विघटनशील अर्थात् सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करण्याचे ठरवणे आवश्यक आहे. अनेक सभासंमेलने कार्यशाळा येथून कचरा वर्गीकरण हे काम महिलांचे असल्यामुळे प्रथम महिलांनी शिकून घ्या, असे विचार ऐकायला मिळतात; मात्र कचरा उचलणे किंवा स्वच्छता राखणे ही घरातील महिलांचीच फक्त जबाबदारी नसून, कर्त्या पुरुषासहित आबालृद्धांची जबाबदारी आहे, याची जाणीवजागृती होणे देखील अत्यावश्यक आहे. आता घरातील प्रत्येक सदस्याला ओला आणि सुका कचरा म्हणजे काय याची जाणीवजागृती करून देणेही अत्यावश्यक आहे. कारण, दूध पिशवी ही ओल्या कचऱ्यात टाकणारी शिकलेली अनेक मंडळी आम्ही पाहिली आहेत; मात्र येथे हा फरक समजून घेणे अतिमहत्त्वाचे आहे. दूध पिशवी ही ओली असली तरी देखील आतील दूध काढून झाल्यानंतर ती प्लास्टिकची पिशवी ही विघटनशील आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे सदर पिशवीतील दूध काढून झाल्यानंतर थोडे पाणी टाकून ती खळबळवून सुक्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्येच टाकणं अत्यावश्यक आहे.
ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर या ओल्या कचऱ्यामध्ये काय येतं, हा देखील आपणाला प्रश्न पडणे साहजिक आहे.... ओल्या कचऱ्यामध्ये दोन प्रकार येतात, एक किचन वेस्ट स्वयंपाक घरातील ओला कचरा अर्थात् भाजीपाल्याची देठे, खराब पाने, कांदा-बटाट्याची साले तसेच मांसाहारातील शिल्लक अवशेष इत्यादी आणि दुसरा प्रकार म्हणजे बागेतील ओला कचरा पालापाचोळा झावळ्या, झाप टावळ्या, फांद्या आदी. घरातील ओला कचरा ही प्रामुख्याने प्राधान्यक्रमाने येणारी समस्या आहे. त्याकरिता अनेक कंपन्यांची छोटी-मोठी कचरा खाणारी युनिट (मशिन) बाजारात उपलब्ध आहेत; पण आम्हाला कचऱ्याकरिता इतका खर्च करणे शक्य नाही...याकरिता प्रत्येकानं आपल्या घराच्या कंपाउंडमध्ये एक छोटा तीन बाय दोन फूट लांबी-रूंदी आणि दीड फूट खोलीचा एक खड्डा खणावा. (अर्थात, कमी खोलीचा व अधिक लांबीचा.) या खड्ड्यामध्ये आपल्या घरातील किचन वेस्ट अर्थात् खरकटे किंवा शिल्लक राहिलेला सुका कचरा नेमाने टाकावा. त्यावर स्थानिक प्रशासन किंवा कृषी उत्पादने विक्री केंद्र यांच्याकडून कल्चर विकत घ्यावं, जे अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध असते आणि आठवड्यातून तीनवेळा हा ओला कचरा ढवळावा. या खड्ड्यावर एखादी जाळी किंवा तत्सम झाकण ठेवावे, जे झाकण हवेशीर जाळीदारच असणे आवश्यक. असे केल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला सुमारे १५ ते १८ किलो सेंद्रिय खत घरच्या घरी मिळू शकते. या खताचा उपयोग आपल्याच परिसरातील छोट्या-मोठ्या झाडांना किंवा सेंद्रिय भाजीपाला उत्पादन करण्याकरिता करता येतो. यामुळे ओल्या कचऱ्याचा प्रश्न हा आपल्याच आवारात मिटू शकतो.
कचराप्रश्नावर मात करण्याकरिता स्थानिक प्रशासनाने पुढे येऊन ‘कचरामुक्त कुटुंब’, ‘कचरामुक्त परिसर’, ‘कचरामुक्त नगर’, ‘कचरामुक्त वाडी’, ‘कचरामुक्त वॉर्ड’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करावे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर गावाच्या वेशीवर ‘कचरामुक्त गावामध्ये आपले स्वागत आहे,’ अशी पाटी अभिमानाने लावावी. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपल्या कचऱ्याचे नियोजन व्यवस्थित करून आपल्या घराच्या दारावर किंवा गेटवर कचरामुक्त निवासामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे, अशी पाटी लावावी. कचरामुक्त गाव म्हणजे काय, हे पाहण्यासाठी दूरदूरवरून अनेक नागरिक हे आपल्या गावाला भेटी देतील आणि त्या अनुषंगाने एका सामाजिक पर्यटनाला चालना मिळेल. आपल्या गावातील व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात वृद्धी झाल्याचे लक्षात येईल. ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ त्याच वेळेला प्रत्येकाला समजून येईल. सर्वांना कचरामुक्त गाव आणि कुटुंब करण्याकरिता या श्रावणमासी हार्दिक शुभेच्छा.
(लेखक शाश्वत पर्यावरण विषयात डॉक्टरेट पदवीधारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.