वैभववाडीत बुधवारी आरोग्य चिकित्सा

वैभववाडीत बुधवारी आरोग्य चिकित्सा

Published on

वैभववाडीत बुधवारी
आरोग्य चिकित्सा
वैभववाडी ः वैभववाडी ग्रामीण रुग्णालय व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबिर बुधवारी (ता.३०) सकाळी ११ ते २ या वेळेत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आयोजित केले आहे. या शिबिरात मोफत हृदयविकार, अँजिओग्राफी, पित्ताशयातील खडे, मूतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी, गुडघे व हाडाची तपासणी होणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मूतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयाचे खडे, हाडाचे फॅक्चर, सर्व प्रकारचे कर्करोग, केमोथेरपी, डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईड गाठीवर मायक्रोवेवद्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठींवर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेह मुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन हे उपचार सर्व शिधापत्रिका व आधारकार्ड धारकांना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत. याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
..........................
रानभाज्या प्रदर्शनास
कणकवलीत प्रतिसाद
कणकवली ः विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्गातील दुर्मीळ अशा रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री असा भव्य उपक्रम साजरा करण्यात आला. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू व विश्वस्त अनिल डेगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी निसर्ग निर्मित रानभाज्या व मानवी आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक अच्युत वणवे यांनी रानभाज्यांची ओळख करून दिली. विज्ञान शिक्षिका शर्मिला केळुसकर यांनी रानभाज्यांचे शास्त्रीय महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थांसाठी प्रदर्शन खुले ठेवण्यात आले. यावेळी प्रशालेतील जेष्ठ शिक्षक जनार्दन शेळके, प्रसाद राणे, अमोल शेळके, संदीप कदम उपस्थित होते. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
----
कोळोशीत विद्यार्थ्यांचे
अनियमित बसमुळे हाल
नांदगाव ः कोळोशी-हडपीड हायस्कूलमध्ये सध्या ५३ विद्यार्थी असून सायंकाळी कणकवलीहून आयनलला जाणारी एसटी अनेक वेळा सायंकाळी ७ वाजले तरी येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. शिवाय ही गोष्ट मुलींसाठी धोकादायकही ठरू शकते, असे चेअरमन किशोर राणे व मुख्याध्यापिका गर्जे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी याबाबत पालकमंत्री यांच्याशी बोलून ही गैरसोय नक्की दूर करण्याचे आश्वासन दिले.
------
बीएसएनएल सेवेचे
माजगावात तीनतेरा
ओटवणे ः माजगाव तसेच सावंतवाडी परिसरात गेले अनेक दिवस बीएसएनएल मोबाईलच्या विस्कळीत सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. माजगाव परिसरात बीएसएनएल मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांची तत्काळ दखल घेऊन सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. मोबाईलच्या विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिसरात मोबाईल टॉवर आहे; मात्र बीएसएनएलच्या अनागोंदी कारभारामुळे गावात आधुनिक सेवा उपलब्ध असूनही त्या मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
......................
कीर्तन कार्यक्रमास
आरोंद्यात प्रारंभ
आरोंदा ः येथील सातेरी भद्रकाली मंदिरात श्रावणमासानिमित्त दरवर्षीच्या परंपरेनुसार कीर्तन कार्यक्रमाला शुक्रवारपासून (ता. २५) सुरुवात झाली. श्रावणमासानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी तसेच सायंकाळी ७.०० वाजता कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. येथे अनिल आरोंदेकर बुवा कीर्तन सादर करतात. त्यांना सुनील तिरोडकर (हार्मोनियम) व बाबा मेस्त्री (तबला) व अशोक नाईक (झांज) संगीत साथ देतात. भाविकांनी कीर्तनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com