शिरंबेत तळ्यातील मल्लिकार्जुनाचे मंदिर

शिरंबेत तळ्यातील मल्लिकार्जुनाचे मंदिर

Published on

श्रावण विशेष - लोगो

80330

शिवमंदिरात घुमणार बम बम भोले चे सूर !

इंट्रो

श्रावणात हिरवाईच्या सुंदर साजाने नटलेला कोकण यांचे जसे परस्परांमध्ये गुढ नाते आहे, असंच काहीसे नाते कोकण आणि शिवमंदीरांमध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये असलेली शिवमंदिरे आगळ्यावेगळ्या स्थान महात्म्यासाठी आणि सुंदर रचनेसाठी नावाजलेली आहेत. श्रावण महिना सुरू झालेला असून उद्या पहिला सोमवार आहे. त्यामुळे सर्वत्र नामसप्ताहाचे सुर घुमणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये सजावट सुरू झालेली आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील काही महत्वाच्या मंदिरांचा आढावा...!

शिरंबेमधील तळ्यातील मल्लिकार्जुनाचे मंदिर
आजपासून हजारो भक्तांची हजेरी ; वर्षाचे बारा महिने पाणी पातळी सारखीच
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः संगमेश्वर तालुक्याच्या एका टोकाला असलेले शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदीर चहूबाजूंनी वेढलेल्या निर्मळ आणि स्वच्छ पाण्यात उभे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवमंदीराची अशी एकमेव रचना आहे. श्रावण सोमवारी हजारो भक्तगण येथील तळ्यात स्नान करण्यासाठी आणि शंभू महादेवांपुढे नतमस्तक होण्यासाठी येतात. उद्यापासून सुरू होत असलेल्या श्रावण सोमवारसाठी देवस्थानही सज्ज झालेले आहे. याबरोबरच संगमेश्वर तालुक्यात मार्लेश्वर, कर्णेश्वर, संगम मंदिर, रामेश्वर पंचायतन, सप्तेश्वर राजवाडी येथील सोमेश्वर या मंदिरांमध्येही भक्तगणांची गर्दी होणार आहे.
राज्यात देवरुख जवळील मार्लेश्वर मंदीराची जशी ख्याती आहे, तसंच कसबा येथील चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिर अप्रतिम शिल्प कलेसाठी प्रसिद्ध आहे. या दोन मंदीरांच्या तुलनेत स्थान महात्म्याला तेवढेच महत्व शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदीराला आहे. या मंदिराची भौगोलिक रचनेमुळे ख्याती आहे. ते एकाबाजूला असल्यामुळे सर्वदूर पोहचू शकलेले नाही. विशेष म्हणजे रचनेत आणि पावित्र्यात एकापेक्षा एक सरस असणारी ही मंदिरे संगमेश्वर तालुक्यातच आहेत. कसबा येथे उंच डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात असणारे सप्तेश्वर मंदिर, कळंबस्ते येथील रामेश्वर पंचायतन मंदिर, राजवाडी येथील सोमेश्वर मंदिर ही सारी शिवमंदिरे प्राचीन असून शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत.
शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिराकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे वहाळ फाटा येथून तसेच खेरशेत नायशी फाटा येथून आणि आरवली-माखजन-कासे मार्गे तिकडे जाता येते. संगमेश्वर तालुक्याच्या हद्दीत शेवटच्या टोकाला असलेले मल्लिकार्जुन मंदिर फारसे परिचित नसले, तरीही मंदीरापर्यंत गाडी जाते. त्यामुळे वयोवृद्धांसाठी चांगली सोय झाली आहे. मल्लिकार्जुन मंदिराची रचना अत्यंत लोभसवाणी असून ४० बाय ४० चौरस फूट आकाराच्या तळ्याच्या मध्यभागी मंदिराची उभारणी केलेली आहे. या मंदिरात जाण्यासाठी छोटा पूल आहे. तळ्याची बांधणी मजबूत जांभ्या दगडात केलेली आहे. ते सर्व दगड काटकोनात रचलेले आहेत. मंदिराच्या पाण्यात असलेला चौथराही जांभ्या दगडातील असून चारही बाजूने स्वच्छ आणि वाहते पाणी आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारची रचना अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही. तळ्याच्या मध्यभागी मंदिराच्या चारही बाजूने सारखेच अंतर सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे पाणीही चारही बाजूने सारखेच आहे. या तळ्यातील पाण्याची पातळी वर्षाचे बारा महिने सारखीच असते. मुख्य तळ्यातून वाहणारे पाणी बाजूच्या छोट्या तळीत आणून तेथून पुढे सोडण्यात आले आहे. बाहेरुन सोळा खांबांवर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या पाण्यातील प्रतिबिंब खास उठाव निर्माण करते.
----
चौकट
...असे आहे महात्म्य !
मल्लिकार्जुन मंदिराचे विशेष आणि स्थान महात्म्याचे पावित्र्य म्हणजे येथील शिवलिंग पाण्यात आहे. मंदिराच्या सभा मंडपातून गर्भगृहात जातांना चिंचोळा दरवाजा आहे. गाभारा सभा मंडपापेक्षा खूप खाली असून त्याची रचना तळ्यातील पाण्याच्या उंची प्रमाणे केली आहे. याठिकाणी शंभू महादेवांवर सतत जलाभिषेक सुरु असतो. या मंदिराचा जीर्णोद्धार १९७३ साली करण्यात आला. तेथील तळ्यामधील पाणी स्वच्छ ठेवण्यात मंदिर व्यवस्थापन समितीला यश आले आहे. येथील तळ्यात पाणसर्प असतात आणि शिवलिंगावर नागराज विराजमान होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com