छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते
‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते’
चिपळूण, ता. २९ ः समाजातील सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते, असे प्रतिपादन प्रा. प्रदीप मोहिते यांनी केले. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मोहिते बोलत होते. घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केल्याचे व लोकमान्य टिळक यांनाही प्रसंगी मदत केल्याचे दाखले त्यांनी या वेळी दिले. मनोगतामध्ये प्रा. मोहिते यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी थोर पुरुषांच्या चरित्रातून मिळणारे विचार अत्यंत प्रेरणादायी असतात व त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे आवाहन केले. या वेळी प्राचार्य डॉ. माधव बापट, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, वरिष्ठ महाविद्यालयाचे एनएसएस विभागप्रमुख प्रा. डॉ. उत्तमराव सूर्यवंशी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. प्रदीप वळवी, प्रा. ऋतुजा लोंढे, प्रा. अनिल पुनवतकर उपस्थित होते.