समुद्रावर स्वार होण्यास मच्छीमार सज्ज
80782
देवगड ः येथील खाडीकिनारी मच्छीमारी नौका पाण्यात उभ्या असून, नव्या हंगामासाठी सज्ज आहेत.
80783
देवगड ः येथील खाडीकिनारी मासळी लिलावाच्या जागी अजून तरी शांतता होती. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी)
समुद्रावर स्वार होण्यास मच्छीमार सज्ज
नव्या हंगामाची तयारी; बंदी कालावधी शुक्रवारपासून संपणार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः यंदाच्या मेमध्ये अवकाळी पाऊस आणि लवकर झालेले मॉन्सूनचे दमदार आगमन यामुळे वेळेआधी मच्छीमारी हंगाम संपुष्टात आला असला तरी आता मासेमारीचा पावसाळी बंदी कालावधी शुक्रवारपासून (ता.१) संपुष्टात येत आहे. त्यामुळे मच्छीमार यंदाच्या हंगामासाठी आशेची नवी ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा समुद्रावर स्वार होण्याच्या तयारीत आहेत. येथील बंदरात काही मच्छीमारी नौका खाडीच्या पाण्यात असून, बंदी कालावधी संपताच पावसाळ्यानंतरची ‘पहिली कॅच’ मिळवण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. दरम्यान, पुढील काही दिवस वातावरण चांगले राहण्याचा अंदाज वर्तवल्याने मच्छीमारांसाठी ही समाधानाची बाब ठरण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात अनेक अडचणींवर मात करीत यंदाच्या मासेमारी हंगामाचे पावसामुळे सूप वाजले होते. समुद्रातील मासेमारीचा शेवट होण्यास काही दिवस बाकी असतानाच मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने मच्छीमारांना हंगाम आटोपता घ्यावा लागला होता. १ जून ते ३१ जुलैपर्यंत एकूण ६१ दिवस मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी असतो. या काळात समुद्रातील मासेमारी बंद असते. मात्र, यंदा पावसामुळे मच्छीमारांना वेळेआधी हंगाम ओटोपता घेण्याची वेळ आली होती. उन्हाळी हंगामात अखेरच्या टप्यात किमती मासळी मिळते. मात्र, यंदा मेच्या मध्यापासूनच पावसाने कहर केल्याने मासेमारी हंगाम अडचणीत सापडला होता. त्यामुळे साधारणतः मेअखेरीसचा सुमारे १५ दिवसांचा कालावधी कमी झाल्याचे दिसत होते. पाऊस बरसल्याने मच्छीमारी नौका पाण्याबाहेर काढून त्याची शाकारणी सुरू केली होती. नेहमी गजबजलेला खाडीकिनारचा परिसर अचानक शांत झाला होता. यंदा पावसामुळे मच्छीमारांना जाळी वाळवण्यासाठीही संधी मिळाली नाही. मात्र, ‘जुने जाऊ द्या...’ या उक्तीप्रमाणे मच्छीमार आता मागचे सर्व विसरून यंदाच्या नव्या हंगामाच्या आशेवर आहे. यंदाचा हंगाम सर्वार्थाने यशस्वी ठरावा, असे साकडे घातले जात आहे.
येथील खाडीकिनारी काही मच्छीमारी नौका पाण्याबाहेर असल्या, तरी त्यांची पावसाळी डागडुजीची कामे उरकली आहेत. नौकांची देखभाल तसेच अन्य कामे पूर्णत्वास गेली आहेत. आता शुक्रवारपासून (ता.१) नव्या हंगामाची चाहूल लागत आहे. अधिकृतपणे समुद्रातील मासळी जाळ्यात पकडण्यासाठी मच्छीमारांची धडपड वाढू शकते. येथील बंदरात काही मच्छीमारी नौका पाण्यात तरंगत्या आहेत. त्यांच्या पावसाळी डागडुजीची कामे उरकली आहेत. आता दोन दिवसांत काहींचे बाहेरील मच्छीमार येऊन नौका नव्या हंगामासाठी सज्ज होतील. पावसानंतर समुद्री भागात असलेली किंमती मासळी मिळवण्यासाठी धडपड असेल. त्याला हवामानाचीही बहुदा साथ मिळण्याची आशा आहे. काही हवामान अभ्यासकांनी पुढील काही दिवस वातावरण चांगले राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही स्थानिक मच्छीमारांच्या दृष्टीने जमेची बाब ठरू शकते. कडक ऊन पडल्यास मासेमारी हंगामाची सुरुवात दमदार होऊ शकते.
.....................
नवा हंगाम; नवी आशा
मासेमारी हंगामाला हवामानाची अपेक्षित साथ असणे आवश्यक ठरते. गतवर्षी पावसाने हंगामाचा वेळेआधी शेवट केला होता. आता नव्या हंगामाच्या सुरूवातीला वातावरण चांगले राहिल्यास उन्हाळी हंगामात वाया गेलेले काही दिवस येथे भरून निघतील का? अशा विचारात मच्छीमार आहेत. पावसानंतर चांगली मासळी मिळण्याची आशा असल्याने मच्छीमार या संधीचा लाभ उठवणार का? हेही कळेल.
......................
मुख्यतः पौर्णिमानंतर मासेमारीस प्रारंभ
साधारणतः १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६१ दिवस मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी असला तरी काही मच्छीमार नारळीपौर्णिमा सणाला नौकेची विधीवत पूजा करून तसेच सागराला श्रीफळ अर्पण करूनच नव्या हंगामाची मुहुर्तमेढ रोवतात. तर काही मच्छीमार श्री गणेश चतुर्थी उत्सवानंतरच हंगामाला प्रारंभ करतात. मात्र, काहीही असले तरी शुक्रवारपासून (ता.१) नव्या हंगामाची चाहुल लागणार हे नक्की.
...............................
कोट
80784
यंदाच्या नव्या हंगामासाठी मच्छीमारी नौका तयार आहेत. शासनाचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आता संपुष्टात येईल. त्यामुळे १ ऑगस्टपासून अधिकृतपणे मासेमारीला सुरूवात होईल. समुद्रातील वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार मासेमारीसाठी जातील. मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात होईल. यंदाचा हंगाम समाधानकारक जाण्याची मच्छीमारांना आशा आहे.
- ज्ञानेश्वर खवळे, मच्छीमार, देवगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.